
सामना प्रतिनिधी । लातूर
सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात देशातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारी २०१९ रोजी राष्ट्रव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात बँकींग उद्योगातील ऑल इंडिया बँक एम्पलॉइज असोसिएशन तसेच बँक एम्पलॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटना सहभागी होत आहेत. ८ व ९ जानेवारीचा संप म्हणजेच कामगार लढाईचा एक प्रदीर्घ लढाईचा टप्प्पा सिध्द करायचा आहे. म्हणूनच हा संप यशस्वी करा, असे आवाहन बँक कर्मचारी संघटनेचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी केले. सरकार कुठल्याही पक्षाचे असो कामगार म्हणून आपल्याला संघर्ष अटल आहे, असेही त्यांनी सांगितले.
कामगार संघटनांच्या ८ व ९ जानेवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील संपाच्या निमित्ताने लातूर शहरातील बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखा येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सरकारच्या आर्थिक तसेच कामगार विषयक धोरणांवर जोरदार टिका केली. आज बँकींग उद्योगांचे खासगीकरण करण्याचे सरकार तर्फे नव्याने प्रयत्न केले जात आहे. बँक एकत्रीकरणाच्या माध्यमातून सरकार आपले एकत्रीकरणाचे धोरण पुढे रेटत आहेत. याशिवाय सरकारचे आर्थिक निर्णय निश्चलीकरण, जीएसटी, एफआरडीआय विधेयक यामुळे बँकींग उद्योगात एक अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे. सरकार एकीकडे चुकीचे आर्थिक धोरण राबवत आहे तर दुसरीकडे चुकीचे कामगार विषयक धोरण राबवत आहे. उद्योग कुठलाही असो मृत्यू, निवृत्ती, राजीनामा किंवा बडतर्फी कुठल्या ना कुठल्या कारणाने जागा रिकाम्या झाल्या तर त्या भरल्या जात नाहीत. सरकार नोकर भरती करण्याऐवजी प्रत्येक काम कंत्राटी पध्दतीने करून घेत आहे. याशिवाय नवीन कर्मचाऱ्यांना सरकारच्या नवीन पेंशन योजनेच्या खाईत लोटत आहे तर तजुन्या पेंशन धारकांच्या न्याय मागण्या वर्षेगनती अनिर्णीत ठेवल्या जात आहेत.
यावेळी बोलताना स्टेट बँक कर्मचाऱ्यांचे नेते कॉ. प्रशांत धामनगावकर यांनी बँक विरोधात धोरणाला येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. सदरील निदर्शने कार्यक्रमास लातूर शहरातील तसेच लातूर नजिकच्या शाखांतून १०० ते १५० बँक कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे शहरातील विविध बँकांतील तरुण कर्मचारी कॉ. महेश गंदले, कॉ. सचिन एकूरगे, कॉ. प्रकाश जोशी, कॉ. आदित्य देशपांडे, कॉ. परमेश्वर बडगीरे, कॉ. प्रणाली मेश्राम, कॉ. राधिका मुंडदा, कॉ. महेश घोडके, कॉ. गजानन औटी, कॉ. रोहित पेंडसे व कॉ. श्रीकृष्ट मांडे यांनी सहभाग नोंदवला.




























































