
शेफ विष्णू मनोहर, [email protected]
Lunch date. बल्लवाचार्य विष्णू मनोहरांचे नवे सदर… मनात शिरण्याचा मार्ग हा पोटातून जातो. दर आठवडय़ाला भेटूया एका मान्यवर व्यक्तीला विष्णूजींसोबत
विठ्ठल कामत आणि ऑर्किड यांचं एक वेगळं नातं आहे. कारण बऱयाच कष्टप्रद आयुष्यातून जात जगातील पहिल्या इकोटेल हॉटेलची निर्मिती केली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडे ऑर्किडमध्ये ‘सावजी-वऱहाडी’ फूड फेस्टिव्हल केला होता. त्यासाठी वैदर्भीय पद्धतीचे खास पदार्थ बनविण्यासाठी मला माझ्या टीमसकट आमंत्रित केले होते. तेव्हाच्या एका प्रसंगानंतर विठ्ठल कामत यांना मी मनोमन गुरू मानायला लागलो. त्याला कारण असं घडलं की, काही पत्रकारांनी पेपरला दुसऱया दिवशी लिहिलं की, ‘फेस्टिव्हलमधील पदार्थ खूपच स्पाईसी आणि ऑईली आहेत.’ हे वाचल्यावर मला वाईट वाटलं आणि मी कामतसाहेबांकडे जाऊन म्हटलं की, ‘‘आजपासून आपण आपले पदार्थ थोडे कमी स्पाईसी आणि ऑईली करू’’ ते म्हणाले, ‘‘असं मुळीच करायचं नाही. आपण त्यांना मुळात विदर्भात जे पदार्थ तयार होतात तेच खायला बोलावलं आहे. म्हणून आपण त्यांना सांगू की, तुम्ही मनाची तयारी करून या की! आता तुम्हाला स्पाईसीच खायचं आहे.’’ असं सांगितल्यानंतर लोक खरोखर आवडीने पदार्थ चाखू लागले.
बघा, गंमत कशी असते! ज्यावेळी ‘इडली, ऑर्किड आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन होते त्यावेळी मी तिथल्या पंचतारांकित हॉलमध्ये दूर उभं राहून देवाकडे प्रार्थना करत होतो की, ‘‘या माणसाची माझी एकदा तरी भेट करून दे!’’ पण गंमत अशी की, तुम्ही मनोमन एखादी इच्छा प्रकट केली तर ती पूर्णत्वास जाते. आम्ही नुसतेच एकमेकांना ओळखतो असं नाही, तर आम्ही चांगले पारिवारिक मित्र झालो. याशिवाय वेळावेळी ते मला मार्गदर्शनसुद्धा करतात. म्हणून मी ठरवलं की, आपल्या सदराची सुरुवात आपण विठ्ठल कामत यांच्यापासूनच करू. ठरल्याप्रमाणे मी सकाळी 9 वाजता त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आवर्जून मला त्यांच्या रूममध्ये बोलावलं आणि तिथे बघतो तर काय! मध्ये एक खुर्ची, त्यामागे पलंग व संपूर्ण खोलीभर वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांचे गठ्ठे. 150 ते 200 सर्टिफिकेट, स्मृतीचिन्हे आणि वेगवेगळ्या नोंदणींचे कागद. यानंतर ते म्हणाले, ‘‘विचारा!’’ मी म्हटलं, ‘‘असं विचारणार नाही, आपण खाता खाता गप्पा मारू.’’ मग ते मला त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये, ‘विंध्याज’मध्ये घेऊन गेले.
आतमध्ये सगळे शिसवी टेबल, खुर्च्या, जोडीने तांबा-पितळेच्या वस्तू. आतमध्ये गेल्यावर त्यांनी मला त्यांच्या आवडत्या ठिकाणी बसायला खुर्ची दिली. याआधीही मी त्यांना तिथेच बसलेलं पाहिलं होतं. बसता बसता कुतूहलाने प्रश्न विचारला की, ‘‘तुम्ही मागे या जागी बसला होतात व आताही याच जागी बसला आहात. यामागे काही कारण आहे का?’’ तर ते म्हणाले, ‘‘विष्णूभाऊ, प्रत्येक जागेचं एक वेगळं वैशिष्टय़ असतं. आपण एखाद्या रेस्टॉरंटमधे गेल्यावर एखादी जागा आपल्याला आवडून जाते, आपण तिथे बसतो आणि नंतर पुढे जेव्हा केव्हा आपण परत तिथे जातो तर त्याच जागेवर असतो. तसं या जागेच्या बाबतीत माझं झालेलं आहे. दुसरं कारण म्हणजे, ही जागा अशी आहे की, मला इथून 70 टक्के रेस्टॉरंटमध्ये बसलेले लोक दिसतात. याशिवाय बाहेरून कोण नवीन येत आहे, किचनमध्ये काय सुरू आहे हे तर दिसतंच आणि ही सगळी कामं करता करता तुमच्या सोबत बोलतासुद्धा येईल.’’ नंतर गप्पांना सुरुवात करण्याआधी त्यांनी एक विशिष्ट प्रकारची कॉफी मागवली. मी म्हटलं, ‘‘अहो, जेवण झाल्यानंतर घेईन.’’ तर ते म्हणाले की,‘‘ ही साधीसुधी कॉफी नव्हे तर जेवणापूर्वी घेण्याची कॉफी आहे. याने तुमच्या जिभेवरचे टेस्ट बड्स उघडतात व पुढच्या चवदार पदार्थांना तुम्ही न्याय देऊ शकता.’’ नंतर तिथला मेनू बघून मी अचंबित झालो. तिथं लक्षात आलं की, सामान्य माणसाची विचार करण्याची क्षमता जिथे संपते तिथे विठ्ठल कामत यांचा विचार सुरू होतो. त्यांच्या या मेनूमध्ये पंचामृत, सत्यनारायणाचा शिरा, विठ्ठल वडा, व्यंकटेश डोसा, दडपे पोहे, मेतकुटाची पातळ चटणी, गुरगुटय़ा भात याशिवाय चित्रान्न, इतर डोशाचे प्रकार, पीयूष, सोलकढी इत्यादी 52 पदार्थांची रास हात जोडून उभी होती.
कॉफीचा पहिला घोट घेतल्यावर लक्षात आलं की, खरंच आपली जिभ स्वच्छ होत आहे. मग त्या कॉफीची खासीयत त्यांना विचारल्यावर त्यांच्या चेहऱयावर आपल्या बाळाचं कौतुक करताना जसे भाव उमटतात तसे भाव उमटले आणि कॉफीबद्दल काय सांगू आणि काय नाही असं त्यांना झालं. ते म्हणाले, ‘‘दोन-तीन प्रकारच्या कॉफी बिया मी कुर्ग येथे जाऊन निवडल्या. त्याचे कमी-अधिक प्रमाण घेऊन एक विशिष्ट चवीची कॉफी तयार केली आणि अजून एका विशिष्ट पद्धतीच्या कॉफी बिया शेतकऱयांना देऊन ती त्यांच्याकडून बनवून घेतली. नंतर ही कॉफी तयार झाली.’’
हे बोलत असतानाच कामतसाहेब अचानक उठले आणि रेस्टॉरंटच्या बाहेर गेले. नंतर पाच मिनिटांनी परत आले. त्यांच्यामागे साधारण मध्यमवर्गीय जोडपं आत आलं आणि कामतसाहेबांनी तेथील एका कर्मचाऱयाला काही सूचना देऊन त्या जोडप्याला बाजूच्या टेबलवर बसायला जागा दिली. नंतर बोलता बोलता मी त्यांना विचारलं की, ‘‘तुम्ही बाहेर का गेलात?’’, तर प्रथम त्यांनी आढेवेढे घतले आणि म्हणाले की, ते बाजूला जोडपं दिसतं आहे ना, ते तिथल्या न्याहारीचं कौतुक ऐकून खायला आले होते, पण इथे आल्यावर बजेट बघून ते परत जात होते. म्हणून मी त्यांना ‘‘पाहुणे म्हणून या!’’ असं म्हणून आत आणलेलं आहे. यावरून कामतसाहेबांची माणसे जोडण्याची हातोटी लक्षात आली. मोठी झालेली व्यक्ती किती नम्र असावी याचा उत्तम नमुना मला दिसला. मग सगळ्यात शेवटी विषय गोडवर आला. मी स्वतः गोडघाशा. त्यामुळे इतर कुणी गोड पदार्थांवर बोलू लागलं तर मला विशेष आनंद होतो.
कामतसाहेबांना माझ्याइतकीच बंगाली मिठाई प्रिय. त्यातल्या त्यात बऱयाच वर्षांपासून ते गुळापासून तयार केलेले गोड पदार्थ, त्यातल्या त्यात रसगुल्ला, मिष्टी दही, रसमलाई इत्यादी पदार्थांचे चाहते आहेत. भुवनेश्वरना त्यांचे एक स्टार हॉटेल आहे, तिथे बरेच काळ वास्तव्य असल्यामुळे त्यांनी मूळ बंगाली मिठाई भुवनेश्वरपासून कशी कोलकात्याला गेली याचे रसभरीत वर्णन केले. कामतसाहेबांची एक सवय मला अजून आवडली ती म्हणजे दुसरं माणूस बोलत असताना त्याला नीट ऐकून घेणे व ऐकता ऐकता त्याच्या तोंडून काही चांगली वाक्यं किंवा शेरोशायरी निघाली तर ते लगेच नावासकट टिपून घेत. त्यांच्या व्हिजिटिंग कार्डबरोबर ते झाडांच्या बिया देतात, जेणेकरून त्या बिया तुम्ही आठवणीने लावून त्याचे वृक्ष करावेत.
अजून या माणसाची एक खासीयत अशी की, ऑर्किडमध्ये काम करणाऱया 90 टक्के लोकांची नावं यांना तोंडपाठ आहेत. कोणी कुठेही भेटला तरी खांद्यावर हात टाकून त्याची आस्थेने चौकशी करतात. जाताना एवढंच सांगेन की, सहाशे वीस हॉटेलची निर्मिती करणारा एक हुशार उद्योजक, उत्तम वक्ता, लेखक यापलीकडे पदार्थांवर मनापासून प्रेम करणारा खवय्या आणि चांगला माणूस मला त्यांच्यात दिसला.























































