परहूर पाडा येथील मैदानावर गोळीबार सरावादरम्यान सुटलेली घुसली ग्रामस्थांच्या घरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अलिबाग तालुक्यातील परहूर पाडा येथे असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर सुरू असलेल्या सरावादरम्यान बंदुकीतून सुटलेली गोळी कार्ले गावातील विजय पाटील यांच्या खिडकीतून बंदूकीची गोळी घरात आली. घरात असलेल्या लहान मुलीच्या बाजूने ही गोळी गेली असल्याने सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र अशा घटना नेहमीच या भागात घडत असल्याची माहिती स्वप्नील पाटील यांनी दिली आहे. अशा घटनांमुळे कार्ले गावातील ग्रामस्थ हे भीतीच्या छायेत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

जिल्हा पोलिस दलातील पोलिस अलिबाग तालुक्यातील परहूर पाडा येथील मैदानावर गोळीबाराचा सराव करीत असतात. आज दुपारी पोलीस गोळीबाराचा सराव करीत होते. त्यावेळी मैदानाच्या बाजूला असलेल्या कार्ले गावातील विजय पाटील यांच्या घराच्या दिशेने गोळी सुटून घराच्या खिडकीची काच फोडून आत घुसली. यावेळी विजय पाटील यांची लहान कन्या हिच्या बाजूने ही गोळी जाऊन घरात पडली. सुदैवाने ही गोळी कोणास लागली नाही. मात्र या घटनेने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

परहूर पाडा येथील मैदानावर नेहमी गोळीबाराचा सराव केला जातो. गेल्या तीन महिन्यापासून पोलीस करीत असलेल्या गोळी बाराच्या गोळ्या ह्या कार्ले गावात येत आहेत. अशी माहिती स्वप्नील पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने यावर योग्य उपाय करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.