
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
झुंजार कामगार नेते, देशाचे यशस्वी संरक्षणमंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या अस्थींचे दफन आज सकाळी येथील पृथ्वीराज रोड दफनभूमीत शोकाकुल वातावरणात करण्यात आले. यावेळी जॉर्ज साहेब अमर रहे…, जब तक सूरज चाँद रहेगा, जॉर्ज तेरा नाम रहेगा… असे नारे यावेळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी दिले.
यावेळी दफनभूमीत फर्नांडिस यांचे बंधू मायकेल फर्नांडिस, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आदींसह फर्नांडिस यांचे असंख्य समर्थक, मित्र परिवार मोठय़ा संख्येने उपस्थित होता.
अस्थी बंगळुरू, मंगलोरला नेणार
कामगार नेता म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांचा उदय मंगलोरमध्ये झाला. तर त्यांचे जन्मस्थान बंगळुरू आहे. त्यामुळे दोन्ही नगरांतील शहरवासीयांनी फर्नांडिस यांच्या अस्थींचे दफन या दोन्ही ठिकाणी व्हावे अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे अस्थी या शहरांमध्ये नेण्यात येतील असे मायकेल फर्नांडिस म्हणाले.



























































