
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
ओएनजीसीसाठी पाणी अपुरे पडत असल्याने खारे पाणी गोडे करून या प्रकल्पाला पुरविले जाणार आहे. याकरिता समुद्राचे पाणी गोड करण्याच्या नावाखाली किनाऱ्यावरील मोठमोठय़ा वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. या सरकारी कत्तलीने पीरवाडीच्या संपूर्ण किनाऱ्याचे अक्षरशः वाळवंट झाल्यासारखेच वाटत असून झाडांअभावी जमिनीची धूप होणार आहे. त्यामुळे नागावप्रमाणे पीरवाडीचा परिसरही अजस्र लाटा गिळून टाकणार आहे.
उरण तालुक्यातील नागाव, म्हातवली व चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील पीरवाडी किनारपट्टीवर केंद्र शासनाचा ओएनजीसी प्रकल्प 30-35 वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणात विषारू गॅस बाहेर पडत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्रात ओएनजीसीने वृक्षलागवड केली होती. अगोदरच विकासाच्या नावाखाली परिसरातील द्रोणागिरी डोंगर पोखरून येथील वृक्षसंपदा नष्ट करण्यात आली असताना आता गोडय़ा पाण्याच्या प्रकल्पाच्या नावाखाली या किनाऱ्यावरील झाडे तोडण्यात येत आहे. त्यामुळे ओएनजीसीच्या विषारी वायुप्रदूषणाने श्वसनाचे, हृदयाचे तसेच कर्करोगासारखे जीवघेणे आजार होतील, अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पीरवाडी किनारा भकास
केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याच धर्तीवर हा प्रकल्प उभारला जात असून ओएनजीसीने यासाठी आपल्या मालकीची पीरवाडी किनाऱ्याची जागा निवडली आहे. या जागेवर मोठ्य़ा प्रमाणात मोठ वृक्ष होते. मात्र आता त्याची छाटणी सुरू केली आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी गोडे होणार की नाही हे माहीत नसले तरी पीरवाडी किनारा मात्र आता भकास होणार अशी भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ओएनजीसी आपल्या मालकीच्या जागेत नवीन प्रकल्प उभारत असून त्यासाठी ही झाडे तोडली जात आहे. त्यांना ही झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. – शशांक कदम, वनपरिक्षेत्र अधिकारी, उरण





























































