
सामना प्रतिनिधी । मुंबई
देशात विजेची टंचाई जाणवत आहे. विजेची मागणी आणि निर्मिती यामध्ये मोठी तफावत आहे. अशावेळी वीज निर्मितीचे पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे. ते शोधण्यासाठी देशातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस झटत आहेत. पवई येथील आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी कचरा डेपोमध्ये कचऱयातून झिरपणाऱया पाण्याद्वारे वीजनिर्मिती करण्याची किमया केली आहे. यामुळे प्रदूषणही कमी होईल आणि वीजनिर्मितीही करता येईल.
देशातील अनेक शहरांमध्ये लाखो टन कचरा निर्माण होतो. अजूनही त्याचे व्यवस्थापन व्यवस्थित केले जात नाही. दुसरीकडे पेट्रोलियम इंधनाच्या वापरामुळे विषारी वायूंचे वातावरणात उत्सर्जन होते. मानवी आरोग्यासाठी या दोन्ही गोष्टी अपायकारक असतात. या दोन्हींवर एकच उपाय आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. आयआयटी मुंबईतील प्राध्यापक प्रकाश घोष आणि त्यांच्या सहकाऱयांनी हे संशोधन केले. कचरा डेपोमध्ये पावसाचे पाणी झिरपून कचऱयातील आर्द्रतेमुळे गडद रंगाचे द्रव्य तयार होते. या द्रव्यामध्ये प्रदूषण करणारे घटक असतात. या द्रव्यावर प्रक्रिया केली नाही तर आसपासचे भूजल प्रदूषित होऊ शकते. मात्र या द्रव्यात काही रसायनेही असतात ज्यांचे विघटन केले तर ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते. मायक्रोबायल फ्यूअल सेल (एमएफसी) तंत्राने आयआयटीतील शास्त्रज्ञांनी कचऱयातील द्रव्यापासून वीजनिर्मिती केली. त्या विजेचे व्होल्टेजही चांगले असल्याचे दिसून आले.

























































