
सामना ऑनलाईन । बंगळुरू
कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल (सेक्युलर)चे सरकार पाडण्यासाठी त्यांच्या आमदारांना 200 कोटींची तर बंडखोर आमदारांना ‘अपात्र’ न ठरवण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 50 कोटींची ऑफर भाजप नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी दिली आहे, असा आरोप काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी आज केला. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
येडियुरप्पा यांनी प्रत्येक बंडखोर आमदाराला 10 कोटी रुपये, 12 आमदारांना मंत्रीपदे आणि सहाजणांना महामंडळांची अध्यक्षपदे देऊ केली आहेत, असे वेणुगोपाल यांनी सांगितले. राजीनामा देणाऱया आमदारांना नंतर होणाऱया निवडणुकीसाठी प्रचार खर्च देण्याचे आश्वासनही भाजपतर्फे दिले जात आहे, असे ते म्हणाले.
येडियुरप्पा हे फक्त मोहरा आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या इशाऱयावरूनच ते आमचे सरकार पाडण्याच्या कारवाया करत आहेत, असे सांगून वेणुगोपाल म्हणाले की, येडियुरप्पांच्या मागे मोदी-शहांचा हात आहे, हे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी उजेडात आणलेल्या ऑडिओ क्लीपवरून स्पष्ट होते.कुमारस्वामी यांनी येडियुरप्पा आणि काँग्रेस-जदसे आघाडीतील एका आमदाराच्या भावाशी केलेल्या संभाषणाची ‘क्लीप’ शुक्रवारीच प्रसृत केली आहे.



























































