
सामना प्रतिनिधी। ठाणे
मजबूत रस्त्यांचे जाळे, सुसज्ज शाळा, अत्याधुनिक आरोग्य केंद्र, उद्याने, चौकांचे सुशोभिकरण असा विकासकामांचा धडाका लवकरच कळवा, मुंब्रा, दिव्यात सुरू होणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे सुमारे 60 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी या कामांच्या भूमिपूजनाचा नारळ फुटणार असल्याने कळवा ते दिवा-देसाईपर्यंतचा मेकओव्हर फास्ट ट्रॅक पकडणार आहे.
ठाणे शहराप्रमाणेच कळवा ते दिवापर्यंतच्या शहरांचा मेकओव्हर करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून लवकरच ही कामे सुरू होणार आहेत. यामध्ये कळवा प्रभाग समितीअंतर्गत विटावा, खारेगाव या भागातील अभ्यासिका, शाळा, आरोग्य केंद्र, रस्ते, उद्याने, चौकांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच विटावा येथील गणेश विसर्जन घाटाचे सुशोभिकरणही करण्यात येणार आहे. त्यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
दिवा-आगासन रोड ते दातिवली रेल्वे फाटक हा रस्ता युटीडब्ल्यूटी पद्धतीने तयार करण्यात येणार असून त्यासाठी 3 कोटी 14 लाख रुपये मंजूर झाले आहेत, तर ओमकारनगर मुंब्रादेवी कॉलनीपर्यंतचा रस्ताही याच पद्धतीने मजबूत होणार असून त्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
साबे गाव येथे 50 लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच साबे गाव येथे शाळा व बालवाडी बांधण्यासाठी 1 कोटी 25 लाखांची तरतूद केली आहे. दातिवली रेल्के फाटक ते उसरघरपर्यंत 30 मीटर रुंदीचा रस्त्याची दुरुस्तीही होणार.




























































