नगरच्या व्यापार्‍याला 16 लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

तामिळनाडू राज्यातील तीन भामट्यांनी नगरमधील एका व्यापार्‍याला 16 लाख 18 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना गडली आहे. 21 टन तूरडाळीच्या व्यवहारात ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात महालक्ष्मी नायडू, अरुणा, निला (पूर्ण नाव माहीत नाही, रा. कोईम्बतूर, तामिळनाडू) यांच्याविरुद्ध फसवणूक व विेश्वासघात केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संजय झुंबरलाल भळगट असे या व्यापाराचे नाव आहे.

भळगट यांचा तूरडाळ विक्रीचा व्यापार आहे. कोईम्बतूर येथील तिघांनी त्यांच्याकडून 21 टन तूरडाळ खरेदी केली. 20 डिसेंबर 2018 रोजी सदर व्यवहार झाला होता. सुरुवातीला एक लाख रुपये देण्यात आले. बाकीची रक्कम नंतर देतो, अशी बतावणी केली. फोन, व्हॉट्सअपवरून वारंवार भळकट यांनी महालक्ष्मी नायडू व इतरांशी संपर्क साधून रकमेबाबत मागणी केली. मात्र सदर तिघांनीही त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संजय भळगट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोईम्बतूर येथील तिघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नागवे हे करीत आहेत.