Pulwama Attack- जगभरातून भ्याड हल्ल्याचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे म्हटले आहे तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्या अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ल्यात जखमी झालेले जवान लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. संपूर्ण देश बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अत्यंत भ्याड हल्ला. संपूर्ण देश या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे. त्यांना अशी अद्दल घडवू की ते पुन्हा ती विसरणार नाहीत-अरुण जेटली, केंद्रीय अर्थ मंत्री

देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या जवानांना माझा सलाम. पुलुवामात सांडलेल्या जवानांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा सूड उगवला जाईल.  या जवानांच्या बलिदानास मी सलाम करतो! रक्ताच्या एका एका थेंबाचा बदला आमचे जवान घेतील असा मी वादा करतो- व्ही.के. सिंग, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यामुळे माझे मन सुन्न झाले आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना माझी विनम्र श्रद्धांजली. या हल्ल्यात जखमी झालेले जवान लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो-राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

जवान शहीद झाल्याने आपण अत्यंत दुःखी झालो आहोत. दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना कराव्यात. शहीद कुटुंबीयांचे दुःख मी समजते. कुटुंबातील सदस्य गमावल्याचे दुःख मला समजते-प्रियंका गांधी, काँग्रेस सरचिटणीस

लष्कर राबवत असलेल्या जोरदार मोहिमेमुळे अतिरेकी बिथरले आहेत. पुलुवामाचा हल्ला अतिशय दुःखदायक आहे. अशा हल्ल्यांमुळे अतिरेक्यांच्या विरोधातील मोहीम थांबणार नाही– सत्यपाल मलिक, राज्यपाल, जम्मू-कश्मीर

या हल्ल्यास जशास तसे उत्तर द्या. हिंदुस्थानी सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे. आम्ही आजवर खूप झेलले आहे. आजचा दहशतवादी हल्ल्याचा प्रसंगदेखील तसाच आहे. मागील दोन ते तीन वेळा जशास तसे उत्तर देण्यात आले. त्यामुळे एक विश्वास वाढला होता. सैनिकांवर झालेला हल्ला हा भ्याड असून आता प्रत्युत्तर दिलेच गेले पाहिजे. कारवाई झाली पाहिजे ही सर्वांचीच अपेक्षा आहे-मोहन भागवत, सरसंघचालक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

दहशतवादाशी मुकाबला आणि दहशतवादाचा पराभव करण्यासाठी आम्ही हिंदुस्थानच्या पाठीशी आहोत. आम्ही पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा तीक्र शब्दांत निषेध करतो. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचे आम्ही सांत्वन करतो- केनिथ जस्टेर,अमेरिकेचे हिंदुस्थानातील उच्चायुक्त

या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे. ‘जैश’च्या दहशतवाद्यांचा हात आहे. आम्ही या हल्ल्यास प्रत्युत्तर देणारच असे मी जनतेस वचन देतो. आम्ही कोणतीही कसूर ठेवणार नाही- राजनाथ सिंह, गृहमंत्री

या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. शहीद जवानांना मी विनम्रपणे श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखदप्रसंगी संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांसमवेत आहे. या कुटुंबीयांना ईश्वराने धैर्य द्यावे, जखमी जवानांना लवकर बरे करावे-व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

पुलवामामध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्याचा आपण तीक्र शब्दांत निषेध करतो. शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे आपण सांत्वन करतो. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

जास्तीत जास्त दहशतवाद्यांना रोखण्यात यश मिळालेले आहे. यामुळे नैराश्यातून ते असे भ्याड हल्ले करीत आहेत. सरकार त्यांच्याविरुद्ध कडक उपाययोजना करणार आहे- राम माधव, भाजप सरचिटणीस