JET एअरवेज ‘कवडीमोल’, 50 टक्के शेअर्सला एक रुपया भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jet-airways

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एकेकाळी देशातील नामांकित एअरलाइन्स कंपनी असलेल्या जेट एअरवेजला आता ‘कवडीमोल’ किंमत उरली आहे. कर्जामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जेटचे 50 टक्के शेअर्सला एक रुपया भाव मिळाला आहे. जेटला कर्ज देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया समूहातील इतर सरकारी बँकांनी जेट एअरवेजवर ही बोली लावली आहे.

देशातील तीन एअरलाइन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या जेट एअरवेजची स्थापना तिकीट एजंट नरेश गोयल यांनी केली. 1990 च्या काळात जेटने एव्हिएशन क्षेत्रातील सरकारी विमान कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणली. सध्या जेटचे 24 टक्के शेअर्स हे अबूधाबीतील एतिहाद एअरवेजकडे आहेत.

सर्वात स्वस्त तिकीट दरामुळे डबघाई

हवाई क्षेत्रात जेट एअरवेजमुळे सर्वात स्वस्त तिकीट दराचा ट्रेंड सुरू केला. पण यामुळे जेट एअरवेज डबघाईला आली. इंधनावरील कर आणि प्रवाशांना पुरविण्यात येणारे खाद्यपदार्थ आणि मनोरंजनावरील कर चुकविताना जेटला प्रचंड आर्थिक नुकसान झेलावे लागले. आर्थिक गणित जुळविण्याऐवजी जेटने प्रवाशांना अनेक सुविधा मोफत दिल्या. यामुळे जेटवर कर्जाचा बोजा वाढतच गेला.

जेट कोसळले तर 23 हजार जण बेरोजगार

जेट एअरकेज कंपनी सुरू राहणे खूपच गरजेचे आहे. बेरोजगारीच्या समस्येमुळे देशातील सरकारवर सध्या टीका सुरू असून जेट कोसळले तर बेरोजगारांच्या संख्येत भरच पडणार आहे. सध्या देशभरात जेटचे 23 हजार कर्मचारी कार्यरत असून कंपनी बंद पडल्यास या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.