मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर- आरोग्यमंत्र्यांची माहीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार करण्यासाठी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) इस्पितळाचे पथक गोमेकॉत दाखल झाले आहे.. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपचारांना मुख्यमंत्री प्रतिसाद देत असून त्यांची तब्बेत आता स्थिर आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल,अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

दिल्लीत एम्समध्ये असताना याच डॉक्टरांच्या निगराणीखाली मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार झाले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी दोनापावल येथील निवासस्थानातून गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. त्यांना जीआय अँडोस्कोपीसाठी दाखल केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जाहीर करण्यात आले होते. मात्र अँडोस्कोपी झाली नसून रविवारी दिल्लीहून आलेल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर नव्याने उपचार करण्यात आले.

ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभागाचे असोसिएट डीन (संशोधन) डॉ. प्रमोद गर्ग हे या गोव्यात आलेल्या डॉक्टरांच्या पथकाचे नेतृत्त्व करीत आहेत.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी सकाळी आणि सायंकाळी गोमेकॉत भेट देऊन आढावा घेतला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आरोग्याच्या सर्व निकषांवर समाधानकारक असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, ‘ मी सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटलो. उद्यापर्यंत त्यांना निगराणीखाली ठेवले जाईल. मनोहर पर्रीकर अ‍ॅक्टिव्ह आणि अलर्टही आहेत, असे नमूद करुन लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

14 फेब्रुवारी 2018 पासून मनोहर पर्रीकर आजारी आहेत. प्रथम त्यांना मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल केले. तेथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर 3 मार्च 2018 रोजी अमेरिकेला उपचारांसाठी गेले. तेथून 14 जून रोजी परतले. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी पुन: अमेरिकेला उपचारांसाठी केले आणि 22 ऑगस्ट रोजी परतले. त्यानंतर महिनाभर दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचार घेऊन 15 सप्टेंबर रोजी ते परतले. अडीच महिन्यांच्या कालखंडानंतर गेल्या 2 जानेवारी रोजी ते कार्यालयात रुजू झाले. 27 जानेवारी रोजी तिस-या मांडवी पुलाच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थिती लावली. 31 जानेवारी रोजी पुन: त्यांना एम्समध्ये नेण्यात आले तेथून गेल्या 5 रोजी ते परतले. गेल्या 9 रोजी भाजपाच्या बूथ कार्यकर्ता संमेलनातही पक्षाध्यक्ष अमित शहा आले होते तेव्हा त्यांनी उपस्थिती लावली.

मुख्यमंत्र्यांच्या वाढत्या आजारपणाची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने बी.एल. संतोष यांना निरिक्षक म्हणून गोव्यात पाठवण्याचे ठरवले आहे.आज ते भाजप मुख्यालयात भाजपच्या आमदारांसोबत राज्यातील राजकीय घडामोडीं बाबत चर्चा करून आपला अहवाल सादर करणार आहेत.