सामना ऑनलाईन, मुंबई
पालिकेने विकासकामांचा धडाका लावला असून आज झालेल्या स्थायी समितीत तब्बल 500 कोटींहून जास्त रकमेचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये रस्ते, शाळा, जलवाहिन्या, पुलांची दुरुस्तीसारखी अनेक कामे करण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांना दर्जेदार सोयीसुविधा मिळणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच सन 2018-19 हे आर्थिक कर्ष संपण्यास जेमतेम एक महिना उरला असल्याने निधी वाया जाण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांबाबतचे तब्बल 700 कोटींचे 80 प्रस्ताb स्थायी समितीच्या पटलावर गुरुवारी मंजुरीसाठी मांडण्यात आले. अवघ्या तासाभरात यापैकी 90 टक्के प्रस्तावांना झटपट मंजुरी देण्यात आली.
ही विकासकामे मार्गी लागणार
- विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय परिसरात वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम – सध्या पाच कोटींची तरतूद
- शाळांच्या सुरक्षा, स्कच्छता, देखभालसाठी – 232 कोटी
- पश्चिम उपनगरातील ‘के’ पश्चिम विभागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण – 23 कोटी 55 लाख
- विलेपार्ले पूर्व येथील शास्त्रीनगर नाला व श्रद्धानंद नाल्याचे बांधकाम करणे – 24 कोटी 99 लाख
- दादर पश्चिम येथील जगन्नाथ शंकरशेठ उड्डाणपुलाच्या खाली सुशोभीकरण – 4 कोटी 59 लाख
- पाण्याची गळती रोखणे – 17 कोटी
- भायखळा येथील पालिका शाळेची दुरुस्ती – 8 कोटी 40 लाख
- शीव पूर्व येथील शाळेची दुरुस्ती – 4 कोटी 57 लाख
- प्रभादेवी पालिका शाळेची दुरुस्ती – 5 कोटी 82 लाख
- आठ पुलांची दुरुस्ती – 17 कोटी
- मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था – सात कोटी
- कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान – 31 कोटी
- शहरात जलवाहिन्या बदलणे, टाकणे – 7 कोटी 76 लाख































































