
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसैनिक रमेश गोवेकर बेपत्ता प्रकरणाची फाइल पुन्हा उघडण्यात येईल. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत बैठक घेऊन ही फाइल पुन्हा उघडण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल तसेच याबाबतची सर्व माहिती सभागृहाला दिली जाईल, असे आश्वासन सरकारच्या वतीने आज विधान परिषदेत देण्यात आले.
2013 मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाबाबत काय तपास केला याबाबतची सर्व माहिती अधिवेशन संपण्यापूर्वी पटलावर ठेवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु पुढे काहीच झाले नाही. गेल्या सहा वर्षांत या प्रकरणात कुठल्याच प्रकारची प्रगती झालेली नाही. याचे उत्तर सरकारने आम्हाला द्यावे अशी मागणी शिवसेना आमदार ऍड. अनिल परब यांनी सभागृहात केली. त्यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी त्यांना याबाबत आश्वासित दिले.
रमेश गोवेकर प्रकरणाची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पटलावर ठेवली. त्यावेळी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणात आम्हाला वारंवार तीच माहिती देण्यात येते. कुठलेही धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाहीत. या प्रकरणात एक मृतदेह हाती लागला होता. तो कुणाचा होता याचाही खुलासा झालेला नाही. ही केस सरकार पुन्हा उघडणार आहे की नाही याबाबत सरकारने ठोस आश्वासन आम्हाला द्यावे अशी मागणी अनिल परब यांनी केली. यावर गृहराज्यमंत्र्यांनी याप्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासाची माहिती आम्ही पटलावर ठेवल्याचे सांगितले. तरीही सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन आम्ही गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत एक बैठक घेऊन ही केस उघडता येईल का, याबाबत विचार करू असे सांगितले. यावर अनिल परब, रामदास कदम, दिवाकर रावते यांनी एकच गदारोळ करत आम्हाला ठोस आश्वासन द्या अशी मागणी केली. त्यावर गृहराज्यमंत्र्यांनी या प्रकरणाची फाइल पुन्हा उघडण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांमार्फत तातडीची एक बैठक घ्यावी असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.
नेमके काय आहे प्रकरण
2005 मध्ये मालवणातील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते रमेश गोवेकर अचानक बेपत्ता झाले होते. या प्रकरणात काँग्रेसच्या बड्या पुढार्यांचा हात असल्याचा आरोप रमेश यांच्या आईनेच केला होता. या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला होता. मात्र सीबीआयने गोवेकर बेपत्ता असल्याचा कुठलाच पुरावा हाती लागलेला नसल्याचे कारण देत ही फाईलच बंद करून टाकली होती.



























































