परळ टर्मिनसमध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वे तासभर ठप्प; प्रवाशांची तंगडतोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

बहुप्रतीक्षित परळ टर्मिनसचे कालच बिगुल वाजले असताना सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी परळ आणि दादर स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने मध्य रेल्वेची सेवा तासभर बंद पडली. त्यामुळे महाशिवरात्रीच्या सणाच्या दिवशीच प्रवाशांना ट्रकमध्ये उतरून तंगडतोड करीत नजीकचे स्थानक गाठावे लागले.

मध्य रेल्वेच्या परळ टर्मिनसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते काल रविवारी शानदार उद्घाटन करण्यात आले. परळ टर्मिनसमधून 16 अप आणि 16 डाऊन लोकल सोडण्याची घोषणा करण्यात आल्याने प्रवाशांकडून त्याचे प्रचंड स्वागत करण्यात आले. सोमवारपासून परळ लोकलची भेट आणि 15 डब्यांच्या अतिरिक्त सहा फेऱयांचा प्रवाशांना लाभ होणार असल्याने प्रवासी खुशीत होते. मात्र, नेहमीच बिघाडांचा इतिहास असलेल्या मध्य रेल्वेने प्रवाशांच्या या आनंदावर विरजण घातले. सोमवारी परळ आणि दादर स्थानकांदरम्यान अचानक सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड उत्पन्न झाला.

नेमके काय घडले…
दुपारी 12.38 वाजता परळ आणि दादर दरम्यान गाडय़ांना वळण्यासाठी उपयोगी येणारा क्रॉस ओव्हरचा पॉइंट फेल झाल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसला. ही स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने गाडय़ांचे क्रॉसींग मॅन्युअली करण्यात आल्याने एकामागोमाग लोकलच्या रांगा लागल्या. त्यामुळे धिमा अप आणि डाऊन मार्ग तसेच जलद डाऊन मार्ग ठप्प झाला.

दुपारी 1.10 वाजता धिमा डाऊन तर दुपारी 1.28 वाजता डाऊन जलद मार्ग पूर्ववत करण्यात तंत्रज्ञांना यश आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. मात्र, याचा फटका सायंकाळपर्यंत जाणवला. मध्य रेल्वेच्या गाडय़ा त्यामुळे तासभर उशिराने धावत होत्या. सुट्टीचा दिवस तसेच दुपारची वेळ असल्याने लोकल फेऱया फारशा रद्द करण्यात आल्या नसल्या तरी प्रवाशांची रखडपट्टी झाली.