
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानातील राष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाची वेबसाईट आज सकाळपासून ठप्प झाली आहे. या वेबसाईटच्या होमपेजवर गेल्यानंतर एक संदेश झळकतो. हा विचित्र संदेश लक्षात घेता भाजपची वेबसाईट हॅक झाल्याची चर्चा आहे. यासंदर्भात अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नसून भाजपच्या आयटीसेलमध्ये खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.

खासगी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त जारी केले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सारबर हल्ल्यांची भीती देखील वर्तवण्यात येत होती. भाजप हा राष्ट्रीय आणि सत्ताधारी पक्ष असल्याने या पक्षाच्या वेबसाईटवर सायबर हल्ल्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. अशातच मंगळवारी सकाळी भाजपची bjp.org ही वेबसाईट बंद पडली आणि त्यावर तुमचे ब्राऊझर तपासले जात असल्याचा विचित्र संदेश झळकू लागला. यामुळे ही वेबसाईट हॅक झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, यावर पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.



























































