विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा अजून दिलेला नाही -राधाकृष्ण विखे पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याचा पुन्हा इन्कार केला आहे. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विखे पाटील यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते पण त्यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले.

नगरमधील उमेदवारीसाठी सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत आले आहेत. विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचा निवडणूक प्रचार सभा कसा करणार असा प्रश्न काँग्रेसमधून विचारला जात होता. मध्यंतरी विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. माझे वडिल बाळासाहेब विखे पाटील आता हयात नाहीत. त्यामुळे निवडणुकीचा संदर्भ घेऊन हयात नसलेल्या व्यक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलायला नको होते अशा शब्दात विखे पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी विखे पाटील नवी दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी व सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उधाण आले पण आपण पदाचा राजीनामा दिलेला नाही असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.