लातुरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाच रस्त्यात अडवून मारहाण करून लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

मोटारसायकलवर जाणाऱ्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना रस्त्यावर अडवून मारहाण करण्यात आली. त्यांच्याजवळील 3 हजार रुपये ही काढून घेण्यात आले. या प्रकरणी अज्ञात चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नारायण बालाजी घुले (रा. पिंपळदरी ता. गंगाखेड) आणि त्यांच्यासोबत शशीकांत हरिभाऊ खेडकर हे मोटारसायकल (क्रमांक एम.एच.25 एजी 5199) वरून 21 मार्च रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याच्या कारणाने पिंपळदरी येथे गेले होते. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ते गावाकडून लातूरकडे येण्यासाठी निघाले. वागदरी गावाच्या जाणाऱ्या कॉर्नरवर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एम.एच.24 ई 8640 क्रमांकाच्या रिक्षामधून आलेल्या चौघांनी मोटारसायकल समोर रिक्षा थांबवली. समोर रिक्षा का थांबवली अशी विचारणा करताच ऑटोमधून उतरून एकाने खेडकर यांना पाठीवर बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्ही पोलीस आहोत असे सांगितले, तरी त्या चौघांनी दोघांनाही लाथाबुक्यांनी, बेल्टने मारहाण केली. खिशातील 3 हजार रुपये काढून घेतले.

त्यांच्या पासून सोडवणूक करून घेऊन दोघेही रेणापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. रुग्णालयात उपचार घेऊन त्यांनी नंतर पोलीस ठाण्यात दि. 22 मार्च रोजी सहा वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केली.अज्ञात चारजणांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.