
सामना प्रतिनिधी । नाशिक
रंगपंचमीनिमित्त सोमवारी रंग खेळल्यानंतर आंघोळीसाठी इगतपुरी रेल्वे तळ्यात उतरलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
घोटी येथील नवनाथनगरचा मयूर अर्जुन भोले (22) व तौसिफ मेहमूद मणियार (23) या दोघांनी सोमवारी दुपारी साडेचार वाजता मित्रांसोबत रंगपंचमी साजरी केली. त्यानंतर हे दोघे इगतपुरी येथील रेल्वे तळ्यात अंघोळीसाठी गेले होते. पोहता येत नसल्याने ते बुडाले. इतर मित्रांनी त्यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वाचविता आले नाही. पोलीस प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने रात्री दहा वाजेच्या सुमारास दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. जमील अली मोहम्मद मन्सुरी यांनी दिलेल्या माहितीवरून इगतपुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.



























































