
सामना ऑनलाईन । मुंबई
वैशाखवणव्याचे चटके आतापासूनच बसायला सुरुवात झाली आहे. जणू काही उष्णतेच्या लाटांनी राज्यावर हल्ला केला असून उन्हाची ही तीव्रता आणखी वाढत जाईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्हाचा कहर वाढतच चालला असून विहिरी, नद्या अक्षरशः कोरड्याठाक पडल्या आहेत. एकीकडे डोक्यावर तळपता सूर्य, रस्त्यावरच्या डांबरातून भट्टीतून निघतात तशा निघणाऱ्या उन्हाच्या झळा आणि डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करणाऱ्या महिला असे चित्र मराठवाडा, विदर्भात दिसत आहे.
मुंबईचा पारा उतरला असला तरीही अंगातून घामाच्या धारा वाहतच आहेत तर अनेक भागांत पारा चाळिशीपार गेला आहे. बीड, जळगाव, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पारा 42 डिग्री सेल्सियसवर पोहचला आहे. त्यामुळे सगळीकडे कडक ऊन असून दुपारी दोन वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.
का चढला पारा…
अरबी समुद्रात प्रतिचक्रवाती म्हणजेच ऍण्टीसायक्लॉन सिस्टीम तयार झाली असून त्याच्या दबावामुळे मुंबईसह राज्यभरात पारा चढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळेही तापमान वाढले आहे. आणखी दोन ते तीन दिवस पारा चढाच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बीड, नांदेडला उन्हाचा तडाखा
बीड जिह्यात 42.3 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. लातूर आणि धाराशीवमध्ये गारांचा पाऊस झाल्याने येथे 38 डिग्री सेल्सियस इतके तापमान होते, परंतु दोन्ही जिल्ह्यांत हवामान ढगाळ असले तरीही उकाडा कायम आहे. दुसरीकडे नांदेडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पारा सतत चढा असून गेल्या दोन दिवसांत तापमान 39 वरून 41 डिग्रीवर पोहचले आहे. 15 एप्रिलनंतर येथे तापमान 40 डिग्रीच्या वर जाते पण आतापासून पारा चढलेला आहे.
महाबळेश्वरची मुंबई झाली
एकीकडे मुंबईचे तापमान 31 डिग्री सेल्सियवर आले असताना दुसरीकडे महाबळेश्वरमध्ये मात्र तापमान 34 डिग्री सेल्सियसवर गेले आहे. म्हणजेच महाबळेश्वरची मुंबई झाली आहे. सगळीकडेच उन्हाचा पारा चढल्याने महाबळेश्वरचाही पारा चढला आहे.
शहर – पारा
चंद्रपूर – 43
बीड – 42.2
वर्धा – 42
जळगाव – 42
पुणे – 41
यवतमाळ – 41
बुलढाणा – 41
गडचिरोली – 41
- सर्वाधिक तापमान चंद्रपूरमध्ये 43 डिग्री सेल्सियस; किमान तापमान अमरावतीमध्ये 18 डिग्री सेल्सियस























































