
सामना ऑनलाईन । बंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये उद्या आयपीएलची लढत बंगळुरूत रंगणार आहे. यावेळी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ या स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. पहिल्या चारही लढतींत त्यांना सपाटून मार खावा लागलाय. त्यामुळे यापुढील सर्व लढती त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ अशाच असणार आहे. दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाइट रायडर्सने तीनपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. उद्या या संघाला तिसऱ्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात स्टार खेळाडूंचा भरणा आहे. यामध्ये विराट कोहली. ए. बी. डिव्हिलीयर्स, मोईन अली. कोलिन डी ग्रॅण्डहोम, मार्कस स्टोयनीस, शिमरोन हेथमायर यांचा समावेश आहे, मात्र या खेळाडूंकडून सातत्याने चमकदार कामगिरी झालेली नाही. गोलंदाजीत लेगस्पिनर युजवेंद्र चहल वगळता एकालाही प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर अंकुश ठेवता आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर पहिल्या चारही लढतींत पराभवाची आपत्ती ओढवलीय.
संघात बदल नक्की
मागील लढतीत पराभूत झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली निराश झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला, आता संघात बदल करावाच लागणार आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे उद्याच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूत बदल होईल हे निश्चित आहे. बेंचवर बसलेल्या खेळाडूंना त्यामुळे संधी मिळू शकते. असे झाल्यास राखीव खेळाडूंना आपली चमक दाखवता येईल.
आंद्रे रसेलचा तडाखा
कोलकाता नाइट रायडर्सला पहिल्या तीन लढतींत घवघवीत यश संपादन करता आले नसले तरी दोन लढतींत विजय मिळवण्यात त्यांनी बाजी मारली. वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने फलंदाजी तसेच गोलंदाजीत आपली धमक दाखवलीय. त्याने ‘वन मॅन शो’ करीत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले आहे. उद्या त्याच्याकडून याच कामगिरीची पुनरावृत्तीची अपेक्षा असेल.
आजची लढत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू–कोलकाता नाइट रायडर्स
स्थळ – बंगळुरू
वेळ – रात्री 8 वाजता



























































