
सामना प्रतिनिधी | मुंबई
ठाणेकरांचा पाडवा होणार ‘पाणी’दार
शनिवारी होणाऱया गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘गोड’ बातमी असून पाण्याचे शटडाऊन 30 ऐवजी 24 तासांचे करण्यात येणार आहे. सहा तासांनी शटडाऊन कमी होणार असल्याने यंदाचा पाडवा ‘पाणी’दार होईल. पाडव्याच्या दिवशी ठाणे जिह्यातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार असल्याने नववर्षाच्या स्वागताचा आनंद खऱया अर्थाने लुटता येणार आहे.
सणाच्या दिवशी त्रास होऊ नये म्हणून एमआयडीसीने शटडाऊनचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जांभूळ केंद्रात जलशुद्धीकरण करून ते एमआयडीसीच्या मोठय़ा पाइपलाइनमधून उल्हासनगर,अंबरनाथ,कल्याण-डोंबिवली,तळोजा एमआयडीसी, ठाणे, मीरा-भाईंदरपर्यंत जाते. काही महिन्यांपासून गुरुवार सायंकाळ 6 ते शुक्रवार रात्री 12 वाजेपर्यंत असे 30 तास पाण्याचे शटडाऊन केले जाते. त्याचा परिणाम काही प्रमाणात शनिवारच्या पाण्यावर पडत असतो.
शनिवारी गुढीपाडवा असल्याने गुरुवार सायंकाळ 6 ते शुक्रवार सायंकाळी 6 असे 30 ऐवजी 24 तासांचे शटडाऊन करण्यात येईल. त्यामुळे पाणीपुरवठय़ावर कोणताही परिणाम होणार नाही. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर या शहरातील नागरिकांना गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच पाणी मिळणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप भारती यांनी सांगितले.
गैरसोय टाळण्यासाठीच
दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी कल्याण, डोंबिवली,उल्हासनगर, ठाणे, भिवंडी आदी विविध भागांमध्ये सकाळी नववर्ष स्वागतयात्रा निघते, तर संगीताचेही कार्यक्रम आयोजित केले जातात. या सर्व कार्यक्रमांची पहाटेपासूनच तयारी सुरू असते. या धावपळीत पाण्याची कमतरता भासू नये म्हणून सहा तासांनी शटडाऊन कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.




























































