
सामना प्रतिनिधी । मानवत
मानवत शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भारतीय स्टेट बँक येथून दोन मुनीमांनी पाच लाख रुपयांचा धनादेश कॅश करुन ही रक्कम आपल्या आडत दुकानदाराकडे घेऊन जात असताना भर दिवसा दोन चोरट्यांनी पाच लाखांची रोकड हातोहात लंपास करत पोबारा केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.
मानवत शहरातील आडत दुकानदार वामन नारायण कोकर यांनी आपल्या मुनीमास बँकेतून रक्कम आणण्यासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. या आडत दुकानावर काम करणारे भरत अमृत पारखे आणि रमेश मुरलीधर कदम यांनी मानवत येथील मध्यवस्ती असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत हा धनादेश देऊन पाच लाख रुपयांची रोकड घेतली. या बँकेपासूनच अज्ञात चोरटे या दोघांवर पाळत ठेवून होते. बँकेच्या बाहेर मुनीम भरत अमृत पारखे व रमेश कदम हे रक्कम घेऊन मोंढ्याच्या दिशेने जाण्यासाठी दुचाकी वाहनावर स्वार झाले. क्षणार्धात या दोघा मुनीमांच्या हातातील रक्कम एका चोरट्याने हिसकावून घेत पलायन केले. या घटनेनंतर पाठलाग करुनही चोरटे हाती लागले नाहीत. यानंतर बँकेमध्ये रक्कम घेतेवेळी कोणकोण आले होते, यासाठी पोलिसांनी बँकेतील सीसी फुटेज माहिती घेऊन अधिक तपास करीत आहेत. रक्कम लंपास केल्याची माहिती आडत दुकानदार वामन कोकर यांना देण्यात आली. चोरट्याचा तपास घेण्याचे काम पोलिसांनी तातडीने हाती घेतले. परंतु कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. या घटनेमुळे मानवत शहरात एकच खळबळ उडाली.































































