विदर्भात मतदानासाठी मोठ्या रांगा, सायंकाळी 6 नंतरही मतदान सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज रोजी झालेल्या मतदानात राज्यातील 7 मतदारसंघात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 55.97 टक्के मतदान झाले. सायंकाळी 6 नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. काही ठिकाणच्या अपवादात्मक घटना वगळता सर्व सात मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान पार पडले, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात गुरुवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले.
वर्धा 55.36 टक्के, रामटेक (अ.जा.) 51.72 टक्के, नागपूर 53.13 टक्के, भंडारा-गोंदिया 60.50 टक्के, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) 61.33 टक्के, चंद्रपूर 55.97 टक्के आणि यवतमाळ-वाशिम 53.78 टक्के.

पहिल्या टप्प्यात राज्यात 14हजार 919 मतदान केंद्रे होती. त्यापैकी अत्यंत कमी म्हणजे 1.5 टक्क्यांपेक्षा कमी मतदान केंद्रावर मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाडीच्या घटना घडल्या. या मतदान केंद्रांमध्ये लगेच काही वेळात मतदान यंत्रे बदलून तातडीने मतदान सुरु करण्यात आले. त्यामुळे यंत्रातील बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत कोठेही खंड पडला नाही, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

राज्यात विविध कारवायांमध्ये आतापर्यंत 104 कोटी 19 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 35 कोटी रुपये रोकड, सुमारे 19 कोटी 12 लाख रुपये इतक्या किंमतीची दारु, सुमारे 5 कोटी 46 लाख रुपयांचे अंमली पदार्थ तर 44 कोटी 61 लाख रुपये किंमतीचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.