
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी महाराष्ट्रातील सात जागांसाठी मतदान पार पडले. किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान सुखरूप पाडले. अनेक ठिकाणी सहा नंतरही रांगा असल्याने मतदान सुरू होते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. तसेच गडचिरोलीतील चार केंद्रावर मतदान झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भात मतदानासाठी मोठ्या रांगा, सायंकाळी 6 नंतरही मतदान सुरू
कट्टर डावी विचारसरणीच्या कृत्यामुळे मतदान पथके पोहोचू न शकल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, गर्देवाडा (पुसकोठी),गर्देवाडा (वांगेतुरी) या ४ मतदान केंद्रांवर मतदान होऊ शकले नाही. या मतदान केंद्रांवर नंतर मतदान घेण्यात येणार आहे, असे दिलीप शिंदे यांनी सांगितले.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील फुलसरगोंदी येथे छोटा बॉम्ब टाकण्याचा प्रकार झाला. यात दोन जवान जखमी झाले. या जवानांना तातडीने हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. याशिवाय आणखी एका बेस कॅम्पजवळ फायरींगचा प्रकार झाला. अशा अपवादात्मक घटना वगळता सर्व सात मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.




























































