
सामना प्रतिनिधी, पिंपळगाव-बसवंत
पिंपळगाव-बसवंत येथे कालिका माता मंदिरात आज दुपारी खेळताना लोखंडी झोक्याचा सांगाडा डोक्यावर पडल्याने बारा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उद्यानातील दुरवस्था झालेल्या खेळण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अंबिकानगर येथील विशाल मल्हारी डंबाळे हा पिंपळगाव विद्यालयात इयत्ता 6वीत शिकत होता. आज दुपारी बारा वाजता शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत घरी येताना देवी मंदिरात ही मुले लोखंडी झोका खेळण्यासाठी गेले. तेव्हा एका झोक्याचा पूर्ण सांगाडा खाली कोसळलेला होता, तो उभा करून ही मुले झोका खेळली. इतर मित्र निघून गेले, मात्र विशाल झोका खेळतच होता. अचानक हा सांगाडा पुन्हा पडला, त्या खांबांमुळे दुखापत होऊन विशालचा जागीच मृत्यू झाला.
विशाल याची घरची परिस्थिती हलाखीची आहे. आईचा तो एकमेव आधार होता. त्या मोलमजुरी करून विशाल व मुलगी मोनिका यांचे पालनपोषण करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पिंपळगाव पोलीस ठाण्यात सोमनाथ विठ्ठल कराटे यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.























































