
सामना प्रतिनिधी। परभणी
घों…घों… घोंघावणाऱया तुफानी वादळातही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परभणीच्या स्टेडियम मैदानावर आयोजित सभा सोमवारी तुफान यशस्वी झाली. ‘निसर्ग आज आपली परीक्षा बघतो आहे. देशाचीही सध्या परीक्षाच सुरू आहे. पण आज इथे उठलेले हे युतीचे वादळच उद्या दिल्लीचे तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही’ असा जबरदस्त आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी या सभेत व्यक्त करताच उपस्थित जनसमुदायानेही ‘जय भवानी, जय शिवाजी’चा प्रचंड जयघोष करून युतीच्या विजयावर जणू शिक्कामोर्तबच केले.
परभणीतील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन सोमवारी सायंकाळी परभणीच्या स्टेडियम मैदानावर करण्यात आले होते. 7 वाजेपर्यंत मैदान खचाखच भरले होते. तेवढय़ात तुफानी वादळ आणि वावटळ उठली. छत्रपती शिवराय आणि शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला वंदन करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले. ते म्हणाले, विरोधकांनी कितीही आघाडय़ा केल्या, कितीही सभा घेत ते महाराष्ट्रात फिरले तरी भगव्याचा हा जल्लोष ते कुठून आणणार आहेत? तुफानातही न डगमगता जागेवर बसून असलेल्या शिवसैनिक आणि गर्दीचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आता मी भिजलो तरी इथून हलणार नाही. एकदा साथसोबत द्यायचं वचन दिलं म्हणजे दिलं. ऊन, वारा, पावसातही मी तुमच्यासोबत राहणार. ही साथसोबत आणि हे वादळच उद्या दिल्लीचं तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही.
या सभेचे सूत्रसंचालन प्रा. पंढरीनाथ धोंडगे यांनी केले. प्रास्ताविकपर भाषण शिवसंग्राम पक्षाचे महासचिव सुभाषदादा जावळे यांनी केले. त्यानंतर भाजपचे विठ्ठल रबदडे यांनी विचार मांडताना काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेला भ्रष्टाचार आणि महायुतीच्या सरकारने शेतकऱयांना केलेली मदत लक्षात घेऊन उमेदवार संजय जाधव यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर, महिला आघाडी संपर्कप्रमुख शिल्पा सरपोतदार, महायुतीचे उमेदवार खासदार संजय जाधव, शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील, पाथरीचे भाजपचे आमदार मोहन फड, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, जालना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, हिकमत उढाण, राम पाटील खराबे, भाजपचे माजी आमदार ऍड. विजय गव्हाणे, भाजप जिल्हाध्यक्ष अभय चाटे, आनंद भरोसे, मेघना बोर्डीकर, गणेशराव रोकडे, विठ्ठल रबदडे आदींसह शिवसेना-भाजप, रासप, रिपाइं, शिवसंग्राम पक्षासह महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पवारांना आता दुष्काळ आठवला
आता निवडणुका आल्यावर शरद पवारांना दुष्काळ आठवला आहे अशी टीका करून उद्धव ठाकरे म्हणाले, गेली पाच वर्षे महाराष्ट्रात दुष्काळाच्या वेळी आमचा शिवसैनिक शेतकऱयांना मदत करत होता, शेतकरीकन्यांचे विवाह लावत होता तेव्हा शरद पवार कुठे होते? आज निवडणुकीच्या काळात गुरांच्या छावणीला भेट दिल्याचे फोटो छापून आणतात. पण हे काम निवडणुका नसतानाही माझा शिवसैनिक करत होता. परभणीचे खासदार संजय जाधव शेतकऱयांसाठी, त्यांच्या पीकविम्यासाठी रस्त्यावर उतरले होते. येथील आमदार डॉ. राहुल पाटीलही शेतकऱयांना दिलासा देण्याचे काम करत होते. ही अशी जोडगोळी परभणीमध्ये उत्तम काम करत असताना आपल्या पदरामध्ये राष्ट्रवादीचे दगडधोंडे कशासाठी घ्यायचे, असा सवालही त्यांनी केला. आजपर्यंत परभणीत तुम्ही ज्याला मोठं केलंत ते निघून गेले पण हा संजय जाधव कट्टर शिवसैनिक आहे. हा मर्द गडीच भगवा हातात घेऊन उद्या लोकसभेत पोहचेल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
लाज वाटते का?
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे जुने पुस्तक उद्धव ठाकरे यांनी आणले होते. ते पुस्तक सभेत फडकवून ते म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीने गुरांच्या छावण्या आणि त्यांच्या शेणातही भ्रष्टाचार केला. उद्या शरद पवार इथे आले तर त्यांना सांगा शेण खाणारी राष्ट्रवादीसारखी औलाद आमच्याकडे नको. आम्हाला जाहिरातीमधून विचारतायत, लाज वाटते का म्हणून! आधी हे तुमच्या भ्रष्टाचाराचे पुस्तक वाचा आणि तुम्हीच सांगा लाज वाटते का ते!’काँग्रेस-राष्ट्रवादीमधील हे दरोडेखोरच आता ‘चोर, चोर’ अशी बोंब ठोकत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.



























































