
सामना प्रतिनिधी, अलिबाग
संसदेत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना आठ मिनिटे बोलून दिले जाते. अशा वेळी सुनील तटकरे यांना निवडून दिले तरी त्यांना जिल्ह्याचे प्रश्न मांडण्याची संधीच मिळणार नाही. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी, शेतकऱ्यांच्या जमिनी घेणाऱ्या व सुतारवाडी पुरते मर्यादित असलेल्या व्यक्तीला दिल्लीत पाठवून काही उपयोग होणार नाही अशी जहरी टीका पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर केली. तर निष्कलंक असणारे व जिल्ह्याचा विचार करणाऱ्या अनंत गीते याना मतदान करून पुन्हा दिल्लीत पाठविण्याचे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
अलिबाग शहरातील भाग्यलक्ष्मी येथे शिवसेना, भाजप, आरपीआय पक्षाच्या विजयी संकल्प सभेचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली. माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अड. महेश मोहिते, विजय कवळे, शहरप्रमुख संदीप पालकर, भाजप शहरप्रमुख सुनील दामले, सतीश लेले, उदय कुठे शिवसेना, भाजप, आरपीआय पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, तटकरेसारखा भ्रष्टाचारी व्यक्ती जिल्ह्याने दिली असून 72 हजार कोटींचा भ्रष्टाचार तटकरे यांनी केला आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी व्यक्तीला निवडून का द्यायचे असा सवाल केला. तसेच संसदेत सत्ताधारी पक्षातील खासदारांना बोलण्यासाठी आठ मिनिटांची संधी दिली जाते. अशा वेळी सुनील तटकरे हे निवडून गेले तरी त्यांना बोलण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे ज्याला बोलण्याची संधीच मिळणार नसेल तर दिल्लीला पाठवून काय उपयोग होणार आहे.
सुनील तटकरे हे खूप बोलतात त्यामुळे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच आरोप करीत फिरा असा टोलाही लगावला आहे. सुनील तटकरे हे प्रादेशिक पक्षातील असून त्याची उडी ही सुतारवाडीपर्यंतच आहे. त्यांना सध्या बाहेरही विरोधक फिरून देत नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत निष्कलंक असलेले सदाचारी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना मतदान करून निवडून आणण्याचे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांसमोर केले.
यावेळी खंडाळा ग्रामपंचायतमधील शेकापच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.



























































