
सामना ऑनलाईन । मुंबई
दादरमध्ये शिवाजी पार्क पोलिसांनी बेकायदेशीर घेऊन जाणारा गुटख्याचा साठा पकडला. 13 गोण्यांमध्ये भरून जप्त केलेल्या या गुटख्याची किंमत 5 लाख 40 हजार इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबतची खबर शिवाजी पार्क पोलिसांना मिळाली. त्यानुसार एपीआय पंढरीनाथ कांदे तसेच महाडिक, शेलार, पाटील आणि बाविस्कर आदींच्या पथकाने रुबी मिल टॉवरसमोर तो ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केली असता 13 गोण्यांमध्ये भरलेला 4200 पॅकेट गुटखा सापडला. गुटख्याची तस्करी करणाऱ्या रामधनी जुम्मन शेख (19) याला अटक केली आहे.
डॉकयार्ड येथे पाच लाखांचा गांजा पकडला
निवडणुकीच्या काळात नशेबाजांची सोय करण्यासाठी आणलेला गांजाचा साठा अमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने पकडला. डॉकयार्ड रोड येथे कारवाई करीत पोलिसांनी 4 लाख 80 हजारांचा गांजा जप्त करून दोघा पेडलर्सना रंगेहाथ पकडले.
डॉकयार्ड रोड येथील नवाब टँक ब्रिज परिसरात काही ड्रग्ज तस्कर गांजाचा साठा घेऊन येणार असल्याची खबर आझाद मैदान युनिटला मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष भालेकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्या परिसरात सापळा रचून नजरूल लुकमन मुल्ला (25), राजबहाद्दूर छबीलाल यादव (32) या दोघा तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली.
























































