
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये ज्यूंचे प्रार्थनास्थळ असलेल्या सिनेगॉगवर एका अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तिचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एका 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
कॅलिफोर्निया इथे अमेरिकन प्रमाणवेळेनुसार सकाळी साडे अकरा वाजता हा गोळीबार झाला. या तरुणाने येथील सिनेगॉगमध्ये घुसूत एआर-15 या प्रकारच्या बंदुकीने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चार जण जखमी झाले. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे जखमींपैकी सर्वात वृद्ध असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. इतर तीन जणांची प्रकृती आता स्थिर आहे. उर्वरित जखमींमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
हा गोळीबार का केला गेला याचा तपास स्थानिक तपास यंत्रणा करत आहेत. अटक केलेल्या तरुणाच्या सोशल मीडियावरील अकाउंटची छाननी सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

























































