
सामना ऑनलाईन। भोपाळ
‘जैश ए मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अजहरला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राइकची गरजच पडली नसती, असे म्हणत भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे. भोपाळ येथे प्रचारसभेत ते बोलत होते.
शहीद हेमंत करकरे यांना आपण शाप दिल्यानेच त्यांचा नाश झाला असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते. या वक्तव्यावरून त्यांच्यावर अनेक स्तरांतून टीका झाली होती. या वक्तव्याला धरूनच दिग्विजय यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर बोचरी टीका केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही दिग्विजय सिंह यांनी टीका केली. दहशतवादी पाताळात जरी लपले तरी त्यांना शोधून काढून त्यांना कंठस्नान घालू असे म्हणणारे पंतप्रधान पठाणकोट, उरी आणि पुलवामा हल्ल्याच्या वेळी कुठे होते, असा सवालही दिग्विजय सिंह यांनी केला.



























































