
सामना प्रतिनिधी, पालघर
लोकसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे काही तास उरले असतानाच पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदार याद्याच बोगस असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तब्बल 56 हजार मतदारांची नावे दोनदा छापली असून शिवसेनेने त्याचा भंडाफोड केला आहे. या प्रकाराने निवडणूक अधिकारीही चक्रावून गेले असून पालघरमध्ये मोठय़ा प्रमाणावर बोगस मतदान होण्याची दाट शक्यता आहे.
शनिवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मतदार याद्याच बोगस आढळून आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 85 हजार एवढे मतदार आहेत तर डहाणू, पालघर, विक्रमगड, वसई, बोईसर, नालासोपारा हे सहा विधानसभा क्षेत्र असून त्यातील मतदार याद्यांमध्ये 56 हजार जणांची नावे दोनदा आढळून आली. त्यामुळे मतदार याद्या तयार करणाऱयांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सुरेखा पाटील या महिलेचे नाव 68 वेळा आले असून सुरेखा जाधव यांचे नाव 46 वेळा यादीमध्ये छापले आहे. ही बाब समजताच शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक, समन्वयक प्रभाकर राऊळ, युवासेना विस्तारक राहुल लोंढे, नगरसेवक विकास रेपाळे आदींनी जिल्हा निवडणूक अधिकाऱयांकडे धाव घेऊन त्यांना निवेदन दिले. एवढेच नव्हे तर या प्रकरणाचे पुरावेही दिले आहेत.
…तर कारवाई करणार!
पालघर मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रे अधिकाऱयांना याद्या पाठवल्या असून मतदानावर वॉच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बोगस मतदान होऊ देणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली असून तसाच प्रकार घडल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप कांबळे यांनी दिले आहे.




























































