
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील 7 लोकसभा मतदारसंघांत प्रचारादरम्यान गदारोळ सुरू झाला आहे. राजकीयदृष्टय़ा अत्यंत जागरूक असलेल्या दिल्लीत आदर्श आचारसंहिता उल्लंघनाचे 208 एफआयआर व डेली डायरी एंट्रीज नोंदविण्यात आल्या आहेत. दिल्लीत 3 कोटी रुपयांची दारू आणि 1400 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या 208 एफआयआरपैकी 18 भाजपविरोधात तर 13 आम आदमी पार्टीविरोधात नोंदविले गेले आहेत. काँग्रेसविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचे तीन तर बहुजन समाज पार्टीवर एक एफआयआर नोंदविला असल्याचे दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंग यांनी सांगितले. राजधानी दिल्लीतील सुमारे 3.4 लाख बॅनर्स, पोस्टर्स आणि हार्ंडग्ज काढून टाकण्यात आली आहेत. 10 मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
अबकारी कायद्याखाली 1155 एफआयआर दाखल केले असून 1157 लोकांना अटक करण्यात आली आहे तर शस्त्रास्त्र कायद्याखाली 424 एफआयआर नोंदविले असून 496 लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी आजवर विनापरवाना 545 शस्त्रे जप्त केली असून वाहने, ध्वनिक्षेपकाचा गैरवापर, बेकायदा सभा, मतदारांना लुभावणे याप्रकरणी 43 गुन्हे नोंदविले आहेत.



























































