दिल्लीतील रोड शोमध्ये केजरीवालांच्या कानशिलात लगावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीसाठी रोड शो सुरू असताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना थप्पड लगावल्याची खळबळजनक घटना घडली. हल्लेखोर तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले आहे.

हल्लेखोर तरुणाचे नाव सुरेश असून त्याने हल्ला कशासाठी केला याचा तपास पोलीस करीत आहेत. नवी दिल्लीतील करमपुरा परिसरातून अरविंद केजरीवाल यांचा रोड शो सुरू होता. हात उंचावून केजरीवाल नागरिकांना अभिवादन करीत होते. तेवढय़ात लाल टी-शर्ट घातलेल्या सुरेशने गाडीच्या बोनेटवर चढून केजरीवाल यांना थप्पड लगावली. या घटनेने गोंधळ उडाला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुरेशला ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी पकडले आणि बेदम चोपले व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्लेखोर सुरेश हा कैलाश पार्क येथे राहतो. त्याने थप्पड का लगावली याचा तपास पोलीस करीत आहेत.

यापूर्वीही हल्ले

केजरीवाल यांच्यावर हल्ल्याची ही पहिली घटना नाही. 4 एप्रिल 2014 रोजी एका तरुणाने केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली होती.

गेल्या वर्षी केजरीवाल यांच्यावर मिरची पावडर फेकली होती. तत्पूर्वी शाईफेकही केली गेली होती.