मंत्रालयात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा,एनएसजी कमांडोंचे मॉकड्रील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

संध्याकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांची वेळ.  मंत्रालयाच्या मंत्री गेटवरच दोन हँडग्रेनेड फुटले. कानठळ्या बजवणारा आवाज कानावर पडला. त्यापाठोपाठ हातात एके-47 घेतलेले चार अतिरेकी ‘अल्ला हो अकबर’चा नारा देत अंदाधुंद गोळीबार करीत मंत्रालयात घुसले. त्यापाठोपाठ आरसा गेटवरही दोन बॉम्ब फुटल्याचा आवाज आला. त्यापाठोपाठ तीन अतिरेकी गोळीबार करीत आत शिरले. काही वेळातच अत्याधुनिक शस्त्र्ाात्रे घेऊन एनएसजी कमांडोंचे पथक दाखल झाले आणि अतिरेक्यांचा खात्मा केला आणि ऑपरेशन मंत्रालय पूर्णत्वास गेले…

थरारक कारवाई

मंत्रालयाच्या इमारतीमध्ये व ऍनेक्स इमारतीमध्ये आज संध्याकाळी मॉकड्रील झाले. मंत्रालयात अतिरेकी शिरल्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि अशा कठीण प्रसंगावर कशी मात करता येईल त्याची रंगीत तालीम झाली. मंत्रालयात एनएसजी कमांडोंनी अशाप्रकारे प्रथमच सराव केला. यापूर्वी एनएसजी कमांडोंनी हेलिकॉप्टपच्या मदतीने आरबीआय बिल्डिंगवर सराव केला होता.

मुख्य रस्त्यावरची वाहतूक थांबवली

अतिरेक्यांचा खात्मा करण्याचे ऑपरेशन सुरू झाले होते. मंत्रालयाच्या बाहेरील मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबवली होती. बॉम्बस्फोटाचे आलेले आवाज व थांबवलेली वाहतूक आणि सायरन वाजवत जाणाऱ्या पोलिसांच्या मोटारी यामुळे मंत्रालयात काही तरी गडबड झाल्याची बातमी आसपासच्या रहिवाशांमध्ये पसरली होती. रस्त्यावरची वाहतूक थांबवल्यामुळे भयाण शांतता पसरली होती. फक्त पोलिसांच्या व एनएसजी कमांडोच्या वॉकीटॉकीचा आवाज येत होता.

पोलिसांचे चोख प्रत्युत्तर

मंत्रालयाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्री गेटवरून कानठळ्या बसवणारे हँडग्रेनेड फोडत चार-पाच अतिरेकी आत घुसले. गेटवरच्या पोलिसांनी गोळीबार करीत एका अतिरेक्याचा खात्मा केला. पण तोपर्यंत एका अतिरेक्याने पोलीस चौकीचा ताबा घेतला आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

ठीक 7 वाजून 31 मिनिटांनी आरसा गेटवर हँडग्रेनेड फोडत आणि गोळीबार करत तीन अतिरेक्यांनी मंत्रालयात प्रवेश केला. गेटवरच्या पोलिसांनी मंत्रालय कंट्रोलकडे मदत मागितली. अतिरेक्यांच्या गोळीबारात पोलीस जखमी झाले होते.

मुंबई पोलिसांच्या क्वीक रिस्पॉन्स टीमने मंत्रालयाच्या परिसराचा ताबा घेतला होता. तोपर्यंत हातात अत्याधुनिक मशीन्स घेतलेले काळ्या गणवेशातील एनएसजी कमांडोंचे पथक दाखल झाले होते. मंत्रालय पोलिसांच्या मदतीने सर्व दालनांचा नकाशा केला. काही वेळातच अग्निशमन दलाचे बंब व स्नॉरकेल शिडी आली.

 

सर्व मजल्यांवरच्या दालनांतील दिवे बंद

मंत्रालयाच्या सर्व मजल्यांवरच्या दालनांतील दिवेही बंद करण्यात आले होते.  एनएसजीचे कमांडो प्रत्येक मजल्यावरून काळोखात अतिशय सावधपणे पुढे सरकत होते. अतिरेकी कोणत्या मजल्यावरच्या दालनात लपून बसले होते त्याचा थांगपत्ता लागत नव्हता.   अखेर पाचव्या मजल्यावरील दालनात अतिरेकी लपल्याचे दिसले. जोरदार धुमश्चक्री झाली. पुन्हा एकदा बॉम्बचा जोरदार धमाका झाला. पाचव्या मजल्यावरील दालनाला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत मंत्रालयात घुसलेल्या सर्वच्या सर्व अतिरेक्यांचा एनएसजीच्या बहाद्दर कमांडोंनी खात्मा केला होता.