
सामना ऑनलाईन, मुंबई
कोणताही प्रकल्प उभारण्यापूर्वी स्थानिक नागरिकांची मते जाणून घेतली जातात. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) काम मात्र याच्या उलट चालत आहे. मेट्रो-6 प्रकल्पाचे काम एमएमआरडीएने सहा महिन्यांपूर्वीच सुरू केले आणि आता नागरिकांकडून त्यासंदर्भात सूचना मागवत आहे. प्रकल्पासाठी खोदकाम करायचे, झाडे तोडायची आणि नंतर नागरिकांकडून सूचना मागवायच्या या एमएमआरडीएच्या धोरणाबद्दल नागरिकांबरोबरच पर्यावरणवादीही तीक्र नाराजी व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या सूचनांवर आता अंमलबजावणी होणार का असा सवालही त्यांनी केला आहे.
मेट्रो-6 प्रकल्प पूर्व द्रुतगती महामार्गावर लोखंडवाला ते विक्रोळी असा आहे. एमएमआरडीएने गेल्या रविवारी त्यासंदर्भात एक जाहीर सूचना प्रसिध्द करून या प्रकल्पाबद्दल नागरिकांकडून सूचना आणि आक्षेप मागवले आहेत. हा प्रकल्प भुयारी करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. परंतु त्यांच्या त्या मागणीची काहीच दखल न घेता एमएमआरडीएने या मार्गावरील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि पवई येथे डिसेंबर 2018 पासूनच कामाला सुरूवात केली. त्यामुळे आता आक्षेप नोंदवून त्यांची दखल काय घेणार अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
येत्या 21 मे रोजी नागरिकांना सूचना व आक्षेप नोंदवण्यासाठी एमएमआरडीएने बैठक बोलवली आहे. नागरिकांबरोबरच स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी यांनीही या बैठकीला उपस्थित राहून आपली मते मांडावीत असे एमएमआरडीएने म्हटले आहे.
एमएमआरडीएला पर्यावरणाची चिंताच नाही
या प्रकल्पाबद्दल पर्यावरणवाद्यांकडूनही एमएमआरडीएने सूचना मागवल्या आहेत. पण यापूर्वी विविध मेट्रो प्रकल्पांसाठी हजारो झाडे तोडणाऱ्या एमएमआरडीएला पर्यावरणाबद्दल काहीच चिंता नसल्याचा आरोप पर्यावरणवादी झोरू बथेना यांनी केला आहे. यापूर्वी मेट्रोसाठी मूळासकट उखडून इतरत्र पुनर्रोपित केलेल्या झाडांपैकी 50 टक्के झाडे जगलीच नाहीत आणि पुनर्रोपणासाठी नवे तंत्र वापरण्याची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही असे बथेना यांनी सांगितले.


























































