
सामना ऑनलाईन । गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील येडसूर गावाजवळ नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली आहे. बुधवारी रस्त्याच्या कामासाठी आणले गेलेले पाण्याचे टँकर आणि मिक्सर मशिनला नक्षलवाद्यांनी आग लावली.
एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या कारका गावालगत नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील एक पाण्याचे टँकर व मिक्सर मशिनची जाळपोळ केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत कारका गावालगत गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. दरम्यान बुधवारी दुपारी सशस्त्र नक्षलवाद्यांनी मजूरांना काम बंद करण्याचे फर्मान सोडून दोन वाहनांना आग लावली. यात अमरावती येथील एका कंत्राटदाराचे लाखो रुपयाचे याचे नुकसान झाले. नक्षलवाद्यांनी गेल्या काही दिवसापासुन जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.
यापूर्वीही नक्षलवाद्यांनी बॅनर लावून विकासकामांना विरोध दर्शवला होता. महाराष्ट्र दिनी झालेल्या हल्ल्याच्या एक दिवस आधीही त्यांनी जांभुळखेडा परिसरात जाळपोळ केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र दिनी जांभुळखेडा जवळील लेंडारी नाल्यावर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात तब्बल 15 पोलीस जवान व एक खासगी वाहन चालक हुतात्मा झाले होते.



























































