अवैध वाळूउत्खन: 11 लाख 50 हजार रुपये किमतीचा 230 ब्रास वाळूसाठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पैठण

गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या टाकळीअंबड व आवडेउंचेगाव या दोन्ही गावांत महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या धाड टाकली. यात 11 लाख 50 हजार रुपये किमतीचा 230 ब्रास एवढा वाळूसाठा जप्त करण्यात आला.

तहसीलदार महेश सावंत व पैठणचे पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड यांनी सशस्र जवानांसह नदीपात्र परिसरात मध्यरात्री 2.50 वाजता ही कारवाई केली. आवडेउंचेगाव येथे रात्री प्रथम अचानक छापा टाकण्यात आला. तेथे 125 ब्रास वाळूसाठा जप्तीची कार्यवाही करून टाकळीअंबड येथील वाळूसाठ्यावर छापा मारण्यात आला. येथील अवैध वाळूउत्खन करून गोदापात्रात साठवलेली 105 ब्रास वाळू जप्त करून ताब्यात घेण्यात आली.

बाजारमूल्यानुसार एकूण 11 लाख 50 हजार रुपये किंमतीचा हा 230 ब्रासचा वाळूसाठा जप्त करून ताब्यात घेण्यात आला. या धडक कार्यवाहीत तहसीलदार महेश सावंत व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, तलाठी अनिल हुग्गे, पो. कॉ. पठाण, कोतवाल सतीश दळवी व चालक गायकवाड पथकात सामील होते. गोदाकाठावरील 14 गावांमध्ये वाळूतस्कर सक्रिय झालेले आहेत. नदीची पूर्णपणे चाळणी करण्यात आली आहे. नदीपात्रात वाळवंटच शिल्लक राहिले नाही. परिणामी वाळूअभावी नैसर्गिक पाझर प्रक्रियेवर विपरीत परिणाम झालेला आहे. पावसाळ्यात नदी भरून वाहू लागली तरी जलप्रदूषणाची समस्या यापुढे डोकेदुखीची ठरणार आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने कार्यवाहीतील सातत्य कायम ठेवून वाळूचोरीचा बीमोड करावा, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.