
सामना ऑनलाईन। सोलन
अखेर मला समजले की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गॉड लवर्स नसून ते तर गॉड-से लवर्स आहेत अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर भाजप नेत्यांवर ट्विटरवरून निशाणा साधला तर हिमाचल प्रदेशातील सोलन येथील प्रचारसभेत नोटाबंदीवरूनही राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. दरम्यान, काँग्रेस जर सत्तेवर आली तर सध्या उपलब्ध असलेल्या 22 लाख सरकारी नोकऱया बेरोजगारांना दिल्या जातील असे आश्वासनही राहुल यांनी यावेळी जनतेला दिले.
अलीकडेच अभिनेता अक्षयकुमारने घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीवरूनही राहुल यांनी टीका केली. देशात बेरोजगारीची समस्या अत्यंत मोठी आहे, पण मोदी म्हणतात मी झाडावर चढून आंबे खातो. ते म्हणतात सुटकेसमध्ये जागा नव्हती म्हणून मी माझा कुर्ताच कापला. मोदी कुठल्या जगात वावरतात अशी टीकाही राहुल यांनी केली.
नोटाबंदीचा निर्णय घेताना सर्व मंत्र्यांना कोंडले होते
नोटाबंदीचा निर्णय घेताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना कोंडून ठेवले होते, असा आरोपही राहुल यांनी केला. भारतीय रिझर्व्ह बँकेने देशाच्या अर्थव्यवस्थेला मार्ग दाखवला. आरबीआयलाही मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेताना विचारले नाही, असा आरोपही राहुल यांनी केला.
पुलवामाचे राजकारण
नरेंद्र मोदींनी पुलवामा हल्ल्यातील शहीद आणि मुंबईवरील 2008 च्या दहशतवादी हल्ल्याचे राजकारण केल्याचा आरोपही राहुल यांनी यावेळी केला. दरम्यान, ढग येतात तेव्हा एअर इंडिया आणि इंडिगोची विमाने रडारवरून गायब होतात का, असा सवाल करत बालाकोट हल्ल्याप्रसंगी आपणच ढगाळ वातावरणाचा हवाई दलाला फायदाच होईल या मोदी यांनी केलेल्या विधानावरूनही राहुल यांनी टीका केली.

























































