सालगड्यासह शेतमालकाचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मारतळा

लोहा तालुक्यातील हातनी येथील शेतमालक गंगाधर उबाळे (४५) आणि त्याचा सालगडी केशव हनवते (१८) हे काल रात्री जनावरांना पाणी पाजण्यासाठी आपल्या गावशिवारात असलेल्या विटभट्टीच्या मोठ्या हौदावर गेले होते. जनावरांना पाणी पाजताना त्यांच्या सालगड्याचा तोल जावून तो हौदात पडला व त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. आज सकाळी या दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

हातणी येथील शेतकरी गंगाधर पांडुरंग उबाळे (४५) हे शेती बरोबर गाई व म्हैशी आपल्या आखाड्यावर बाळगून शेतीपुरक दुग्धव्यवसाय करतात. काल सायंकाळी शेलगडी केशव ग्यानोजी हाणवते (१८) व स्वतः आपल्या आखाड्यालगत असलेल्या विटभटीच्या हौदावर आपल्या बैलांना व दुभत्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी नेले. जनावरांना २२ ते २५ फुट खोल असलेल्या व आत १० फुट पर्यंत पाणी असलेल्या विस्तीर्ण हौदावर नेवून नोकर केशव हाणवते पाणी शेंदत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो हौदात पडला. त्याला वाचवण्यासाठी शेतमालक गंगाधर उबाळे यांनी पण हौदात उडी घेतली. तथापी हौद विस्तीर्ण असल्यामुळे त्यांना बाहेर पडण्यासाठी कोणताच उपाय करता आला नाही. त्यातच सायंकाळी उशिरा ही दुर्घटना घडल्यामुळे रस्ता वर्दळीचा असूनही कोणीही त्यांच्या मदतीस धाऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंतही शेतमालक गंगाधर उबाळे व नोकर केशव हाणवते घरी नाही आल्यामुळे घरच्या मंडळींनी शोधाशोध केली असता शेतातील गाई, म्हैशी व जनावरे हौदालगत असलेली दिसली. लगेच या सर्व मंडळींचे हौदाकडे लक्ष गेले असता हौदाजवळ दस्ती, काठी व बुट त्यांना आढळून आले. हौदात डोकावून पाहिले असता त्या दोघांचेही प्रेत पाण्यावर तरंगत असताना त्यांना दिसले.

गावकऱ्यांकडून या घटनेची माहिती उस्माननगर पोलिसांना देण्यात आली. सकाळी उस्माननगर पोलिसांनी प्रेत पाण्याबाहेर काढून पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी कापसी बु. येथे आरोग्य केंद्रात रवाना केले. बुधवारी दुपारी वैद्यकीय अधिकारी आर. के. मुनेश्वर व बि. जे. धनगे यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांकडे सुपुर्द केले. त्यानंतर शेतमालक व शेतगडी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शेतकरी गंगाधर उबाळे याला पत्नी, एक विवाहीत मुलगी व एक लहान मुलगा असा परीवार आहे. त्यामुळे या कुटुंबियांचा अधारवडच गेला आहे. तर गरीब शेतगडी केशव हाणवते हा अविवाहित होता. या घटनेमुळे गाव व परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची उस्माननगर पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली असून स.पो.नि. नितीन चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार एम. जे. बेग हे पुढील तपास करीत आहेत.