
>> शेफ विष्णू मनोहर, [email protected]
समीर धर्माधिकारी. मॉडेल, अभिनेता, खाण्यावरही तितकेच प्रेम… कुळीथ पिठल्यापासून मटण बिर्याणीपर्यंत सारे पदार्थ हातखंडा…
समीर धर्माधिकारी. विमल, दिग्जॅम यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांचा मॉडल म्हणून आपण त्याला बघत आलो. नंतर तो हळूहळू हिंदी, मराठी चित्रपटात रुळला. माझी त्याची पहिली ओळख नागपूरला झाली. नागपुरात रामायणावर एक महानाटय़ होतं, त्यामध्ये त्याने रामाची भूमिका केली होती आणि मी त्यात दशरथ, कुंभकर्ण याची भूमिका करायचो. राम जेव्हा वनवासात जायचा त्यावेळी आमची गळामिठी असायची आणि हे रेकॉर्डेड नाटक असल्यामुळे स्टेजवर फक्त ऍक्शन करायची. इथे मी एवढय़ा सिरीयस प्रसंगात त्याच्या कानात इतर कलाकारांच्या आणि डायरेक्टरच्या चुगल्या करायचो. तो पण तेवढय़ाच समर्थपणे प्रसंग पार पाडायचा. नंतर कधीतरी आम्ही कार्यक्रमात भेटत असू. एकदा मेजवानीच्या सेटवर तो आला असताना त्याने ‘ग्रीन चिकन’ नावाचा एक छान पदार्थ बनविला होता. तेव्हा त्याला म्हटलं की, मला तुझी एक छान मुलाखत विथ डिनर घ्यायची आहे, तो तयार तर झाला, पण काही केल्या आम्ही एकत्र भेटू शकलो नाही. शेवटी मी फोनवरच त्याच्याशी बोललो आणि एका ऍवॉर्ड कार्यक्रमात त्याच्याशी चर्चा केली.
समीर म्हणतो की, खाणं या विषयावर फार चर्चा होत नाही, कारण जिथे उत्तम जेवणाच्या महफिली असतात, तिथे शांतपणे जेवणात मजा येते. त्यामुळे चर्चा होत नाही.
खाण्याबद्दल त्याच्या आवडी-निवडी काही विशेष नाही, कारण त्याला लहानपणी आईने सांगितले की, पानात जे वाढलं ते निमूटपण खायचं त्यामुळे ताटात जे मिळेल ते खाण्याची सवय लागली.
वरण-भात कसा करावा हे त्याच्या आईने त्याला लहानपणीच शिकवलं होतं. आता त्याला व्यवस्थित स्वयंपाक येतो. पण नॉनव्हेज बनवायला समीरला फार आवडतं, विशेषतः मटण बनवायला…
खाण्याचे किस्से सांगताना तो म्हणतो की, एक किस्सा माझ्याबरोबर जपानमध्ये घडला तो असा की एकदा मी काही कामानिमित्त जपानला गेलो होतो तेव्हा तेथील बाजारातून काही पदार्थ मी उचलले होते. पण गमंत अशी झाली की जे पदार्थ दिसायला गोड होते ते चवीने तिखट निघाले आणि जे पदार्थ दिसायला तिखट होते ते चवीला गोड निघाले.
विशेष आवडत असलेले पदार्थ विचारल्यावर तो म्हणतो वरणं-भात त्यावर तूप आणि बरोबर ठेचा हे कॉम्बिनेशन मला अतिशय आवडतं, तसंच पिठलं-भात व बरोबर ठेचा हेसुद्धा तितकचं प्रिय आहे.
खाण्याबद्दल चर्चा यावर त्याने एक प्रसंग सांगितला की त्याचा एक मित्र आहे राजेश खळे त्याच्याकडे दुपारच्या जेवणात चविष्ट मासे असतात आणि जेवता-जेवता आपण संध्याकाळच्या जेवणाला कोणते मासे करावे याची चर्चा होते, ते कसे बनवायचे वगैरेवगैरे…ते ऐकायला मजा येते पण चर्चेत सहभग घेता येत नाही, कारण मेफिलीत चांगलं जेवण असलं की तुमचं पूर्ण लक्ष जेवणाकडे असतं असे तो म्हणतो. आवडतं रेस्टारेंटबद्दल विचारल्यावर तो म्हणाला की माझ्या जवळच्या मित्राचं एक रेस्टॉरेंट आहे विष्णूजी की रसोई, तिथे जायला मला आवडतं व तिथे मी हक्काने जातो, ते रेस्टॉरेंट माझेच असल्यासारखे वाटते.
कुळथाचं पिठलं
साहित्य – कुळथाचे पीठ 1 वाटी, दही अर्धी वाटी, लसूण 2 चमचे, मोहरी 1 चमचा, हिरवी मिरची 4-5, हिंग पाव चमचा, हळद पाव चमचा, तेल 4 चमचे, मीठ चवीनुसार, कोथिंबीर 4 चमचे.
कृती – 4 चमचे तेलात 2 चमचे बारीक चिरलेला लसूण, मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून थोडे हिंग, हळद घाला व 2 वाटय़ा पाणी घाला. अर्धी वाटी दह्यात 1 वाटी कुळथाचं पीठ घालून पेस्ट बनवा. हे मिश्रण फोडणी दिलेल्या पाण्यात ओता. चवीनुसार मीठ घालून मिश्रणाला उकळी येऊ द्या. थोडी कोथिंबीर घालून गरम भाताबरोबर सर्व्ह करा.
हैदराबादी मटण बिर्याणी
साहित्य – बासमती तांदूळ अर्धा किलो, कोवळे मटण 1 किलो, दही 1 वाटी, आलं-लसूण पेस्ट 3 चमचे, कांदे उभे पातळ चिरलेले 5 नग, काजू 12 नग, लाल सुक्या मिरच्या (भिजवून वाटलेल्या) 5-6, बडीशेप पाव चमचा, मीठ चवीनुसार.
कृती – प्रथम मटण स्वच्छ धुऊन दही, आलं, लसूण थोडे मीठ लावून 2 तास ठेवा. भरपूर तूपात पातळ चिरलेले कांदे तळून घ्या. तळलेला कांदा पाव भाग काढून ठेवा. उरलेल्या तुपात काजू व मिरचीची पेस्ट परता. मग मटण व पाव चमचा बडीशेप घालून चांगले परता. मीठ व सव्वा वाटी पाणी घालून शिजवा.
भात – थोडय़ा तुपात 5 हिरवे वेलदोडे, 5 लवंग व थोडी जायपत्री व धुतलेले तांदूळ घाला. मीठ व पाणी घालून अर्धाकच्चा भात तयार करून थंड करा. काढून ठेवलेला कांदा, कोथिंबीर व थोडा पुदिना चिरून एकत्र करा. मटण, भात, कांदा पुन्हा मटण असे थर द्या. शेवटी पाऊण कप दुधात केशर अथवा केशरी रंग घाला. त्यातच 1 थेंब केवडा इसेन्स घालून शिंपडा. झाकणाच्या बाजूने कणिक लावून बंद करा. गॅसवर 7-8 मिनिटे गरम करा. रायत्याबरोबर सर्व्ह करा.





















































