
सामना ऑनलाईन । वाराणसी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेस आणि विरोधीपक्षांचे नाव घेता त्यांच्यावर शरसंधान केले. या देशातील परंपरा, इतिहासाची प्रतीमा खराब करून दाखवण्याचा प्रयत्न आतापर्यंत काही राजकीय पंडितांना केला आहे, असे म्हणतानाच अयोध्येत दिवाळी साजरी करण्यास कुणी रोखलं होतं? असा खणखणीत सवाल केला. मोदींच्या या भाषणातून मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची निश्चित दिशा त्यांनी कार्यकर्त्यांच्या निमित्ताने देशासमोर मांडली.
या देशाच्या परंपरांना आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं. यामुळे कुंभमेळा म्हणजे केवळ नागासाधूंचा मेळा असं चित्र तयार करण्यात आलं होतं. मात्र ते चित्र आम्ही बदललं. योगी आदित्यानाथ यांनी कुंभमेळ्याचे सुंदर आयोजन करून या देशाची परंपरा किती महान आहे, ते दाखवून दिलं.
अयोध्येत आतापर्यंत दिवाळी साजरी करण्यास कुणी रोखलं होतं. पण आम्ही उत्तर प्रदेशात सत्तेत आल्यानंतर भव्य स्वरुपात अयोध्येत दिवाळी साजली केली. तसेच भगवान रामाला ज्या विविध रुपांनी जगभरात ओळखलं जातं ती रुपं 26 जानेवारीच्या गणतंत्र दिनाच्या परेडवेळी चित्ररथातून दाखवण्यात आली, हे आमच्या सरकारने केलं, असं मोदींनी अभिमानाने सांगितलं. तसेच या देशातील ऋषी-मुनी-भगवान यांचा गौरव कुणाला नसेल पण मला त्यांचा गर्व आहे, असे देखील मोदी यावेळी म्हणाले.
अंकगणितापेक्षाही केमेस्ट्री सरस
अंकगणिताच्या पुढे देखील एक केमेस्ट्री आहे. समाजाच्या प्रेमाची केमेस्ट्री. यंदा अंकगणिताला या केमेस्ट्रीने पराभूत केलं आहे. ‘politics above the perception’, असे मानले जाते. त्यामुळे खोट्याचा आधार घेतला जातो. खरी प्रतीमा लोकांपर्यंत पोहोचवले जात नाही आणि दुसरे म्हणजे प्रतीमा खराब करण्याचा प्रयत्न होतो. मात्र यंदा सिद्ध झाले की पारदर्शक आणि परिश्रम एकत्र आले तरी खोटी प्रतीमा तयार करण्याचा किती प्रयत्न झाले तरी त्याला टक्कर देतो. आपल्याला आज तेच लोकांपुढे घेऊन जायचे आहे. नकारात्मक विचारधारा असताना देखीन आपण पारदर्शकता आणि परिश्रमाने अशक्य ते शक्य करून दाखवायचे आहे, असे मोदी म्हणाले.
सरकार निती बनवते, संघटना रणनिती तयार करते. कार्य आणि कार्यकर्ता एक झाला पाहिजे, ते आश्चर्यकारक गोष्टी करू शकतात. जे आपण करू शकत आहोत. सरकारने योजना आणल्या पण कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. आज ज्याला मिळाले नाही, त्याला मिळेल हा विश्वास निर्माण केल्याने विजय मिळाल्याचे ते म्हणाले.



























































