हिंगोली लोकसभेचा विजय शिवसेनाप्रमुखांच्या चरणी अर्पण : आनंदराव जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

2014 मध्ये अल्प मतांनी हिंगोली लोकसभा क्षेत्रात झालेल्या पराभवाचे शल्य शिवसैनिकांच्या मनात होते. शिवसैनिक, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या मदतीने हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव प्राप्त करुन देऊ हा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिलेला शब्द खरा करुन दाखविल्याचे मनस्वी समाधान आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांचा प्रचंड मताधिक्याने झालेला विजय वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या चरणी मी अर्पण करतो, असे भावोद्गार शिवसेनेचे हिंगोली लोकसभा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी ‘दै. सामना’ प्रतिनिधीशी बोलतांना काढले. लोकसभेनंतर आता सर्वच विधानसभा मतदारसंघात शिवसेना व महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत, असेही जाधव यांनी सांगितले.

हिंगोली लोकसभा क्षेत्रातुन शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांचा झालेला विजय म्हणजे शिवसेना व महायुतीवर असलेला जनतेचा विश्वास प्रकट करणारा आहे. 2 लाख 77 हजाराचे मताधिक्य देऊन जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविला. या विजयासाठी शिवसेनेचे व भाजपा तसेच महायुतीतील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, शिवसैनिकांनी मोठी मेहनत घेतली आहे. लोकसभेच्या यशानंतर कळमनुरी विधानसभा क्षेत्रासह किनवट मतदारसंघ शिवसेना व महायुतीच्या ताब्यात येण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. यापुर्वी हदगाव, वसमत, हिंगोली, उमरखेड मतदारसंघात शिवसेना व महायुतीचे वर्चस्व कायम राहील, असेही संपर्कप्रमुख जाधव यांनी सांगितले.