
सामना प्रतिनिधी । कुडाळ
तब्बल 43 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे केलेल्या कारवाईत कुडाळ महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला रंगेहात अटक केली. ट्रान्सफार्मरमधून विज पुरवठा चालू करून देण्यासाठी त्याने कुडाळ एमआयडीसीतल्या एक उद्योजकाकडे लाच मागितली होती. शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. हरी महादेव कांबळे (वय 42 वर्षे, रा.एमएसईबी कॉलनी कुडाळ) असे या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार एमआयडीसीमध्ये राहणाऱ्या एका उद्योजकाने केली होती. या घटनेने सिंधुदुर्ग महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
लाच लुचपत प्रतिबंध विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराची कुडाळ एमआयडीसीमध्ये कंपनी आहे. त्या कंपनीसाठी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला होता. तक्रारदार यांनी महावितरण कुडाळ येथे डीपी कनेक्शन मिळण्याबाबत अर्ज दिला होता. विद्युत पुरवठा चालू करुन देण्यासाठी या सहायक अभियंता कांबळे याने 43 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे करण्यात आल्यानंतर 29 मे ते 1 जून या कालावधीत याबाबतची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर एक जून रोजी सापळा रचण्यात आला. रात्री उशिरा हरी महादेव कांबळे याला 43 हजार रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असता एमआयडीसीच्या फाट्यावर टपरी जवळ रंगेहात पकडण्यात आले. तसेच लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक मितेश केणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस फौजदार फाले, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर, सुभाष गवस, पोलीस नाईक निलेश परब, पेडणेकर, खंडे, पोतनीस सहभागी झाले होते, अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने देण्यात आली.



























































