दहावीचा निकाल… उद्या, परवा… कधीही! बोर्डाच्या अजब उत्तराची कमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

सोशल मीडियावर ‘फॉरवर्ड’ होणाऱ्या दहावी निकालाच्या विविध तारखांमुळे सध्या विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. निकालाची नेमकी तारीख समजण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असतानाच बोर्डाने दिलेल्या अजब उत्तरामुळे निकालाच्या तारखेचा गोंधळ आणखीनच वाढला आहे. ‘दहावीचा निकाल उद्या, परवा कधीही जाहीर होऊ शकतो, आताच सांगता येणार नाही.’, असे बेजबाबदार उत्तर बोर्डाकडून मिळत असल्याने विद्यार्थी-पालकांची धास्ती अधिकच वाढली आहे.

 बोर्डाकडून दरवेळेस निकालाची तारीख एक दिवस आधी जाहीर केली जाते. त्यामुळे आज दहावीचा निकाल आहे हे समजल्यावर विद्यार्थी चिंतीत झाले. यंदा बारावीचा निकाल काहीसा लवकर म्हणजेच 28 मे रोजी जाहीर झाला. त्यापाठोपाठ दहावीचा निकालही लवकर जाहीर होईल, असे बोलले जात होते. त्यामुळे निकालाची 6 जून तारीख सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी त्यावर विश्वास ठेवून शाळा आणि बोर्डाकडे विचारणा करायला सुरुवात केली. परंतु या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्टीकरण राज्य शिक्षण मंडळाने दिले. अफवांकर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही केले आहे. गेल्यावर्षी दहावीचा निकाल 8 जूनला जाहीर झाला होता. त्यामुळे यंदाही 8 जूनला निकाल जाहीर होणार असल्याचेही सोशल मीडियावर बोलले जात आहे.

शाळांमध्ये गर्दी; प्रसारमाध्यमांचे फोनही खणाणले

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज गुरुवारी 6 जूनला दहावीचा निकाल जाहीर करणार आहे, असा मेसेज सोशल मीडियावर रात्रीपासून फिरत आहे. या मेसेजमुळे विद्यार्थ्यांची झोपच उडाली. सकाळपासून विद्यार्थ्यांनी शाळेत गर्दी करायला सुरुवात केली. दैनिक ‘सामना’च्या कार्यालयातही फोन करून पालकांनी निकालाविषयी विचारणा केली. बऱ्याच शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत काही शाळांमध्ये उपस्थित असलेल्या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांकडेही निकालाविषयी अधिकृत माहिती नसल्याने विद्यार्थी, पालकांना ठोस उत्तर मिळाले नाही. काही विद्यार्थी सुट्टीनिमित्त बाहेरगावी आहेत. सोशल मीडियावरून निकालाची तारीख जाहीर झाल्याचे समजल्यावर या विद्यार्थ्यांनीही मित्रमैत्रिणी, नातेवाईकांकडे विचारपूस केली. पण प्रसारमाध्यमांमध्ये अजून निकालाची तारीख जाहीर न झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.

बोर्डाची ‘लाईन’ चालू पण ‘हेल्प’ बंद

अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने मुंबई विभागीय शिक्षण मंडळात बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या पूनर्मूल्यांकन अर्जांचा खच पडला आहे. त्यातच निकालाच्या तारखेच्या अफवांमुळे दहावीचे विद्यार्थीही गोंधळात पडले आहेत. दहावीचा निकाल कधी? बारावी पूनर्मूल्यांकनाची स्थिती काय? हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी शिक्षण मंडळाच्या (एसएससी बोर्ड) हेल्पलाईनवर सतत संपर्क साधत आहेत. पण ‘लाईन’ चालू असूनही विद्यार्थ्यांना ‘हेल्प’ मिळत नाही. सारखे रिडायल करून विद्यार्थी पुरते हैराण झाले आहेत.

दहावीच्या निकालाच्या तारखांवरून बुधवारपासून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. निकालाच्या तारखेची शाहनिशा करण्यासाठी विद्यार्थी-पालक बोर्डाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधत आहेत पण त्यांचा फोन ‘रिसिव्ह’ होत नाही. सतत रिडायल करूनही कुणी फोन घेत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. हेल्पलाईनवर विद्यार्थ्यांना मदत मिळत नसल्याप्रकरणी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी बोर्डाची हेल्पलाईन सुरू असल्याचे सांगितले. बोर्डातील समुपदेशक फोन का उचलत नाही, याची माहिती घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयात सध्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. पूनर्मूल्यांकन, गुणपडताळणी अर्जाचा निपटारा करण्यासाठी नियमित कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत.

योग्यवेळी प्रसारमाध्यमांना कळविण्यात येईल

दहावीच्या निकालाचे काम पूर्ण झाले आहे. अद्याप निकालाची तारीख ठरविण्यात आलेली नाही. विद्यार्थी, पालकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या तारखांवर विश्वास ठेवू नये. शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे निकालाची तारीख जाहीर केली जाईल. त्याविषयीची माहिती सर्वात आधी प्रसारमाध्यमांना देण्यात येईल- शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.