
सामना प्रतिनिधी। मुंबई
पावसाळा सुरू होताच झाडे पडणे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना वाढल्या असून शुक्रवारी एकाच दिवशी मालाड, अंधेरी आणि गोवंडीत झाड अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू झाला. गेल्या महिनाभरात झाड अंगावर कोसळून मृत्यू झाल्याची ही पाचवी घटना आहे.
मालाडमध्ये सकाळी झाडाची फांदी कोसळून शैलेश राठोड (38) जखमी झाले. त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राठोड हे मालाड येथील नारीयालकाला कॉलनीमध्ये राहत होते. ते मंदिरात पूजा करून घरी परतत असताना त्यांच्यावर झाडाची फांदी कोसळली. अंधेरीतही झाड पडून अनिल घोसाळकर (45) यांचा मृत्यू झाला. चालक असलेले अनिल तक्षशीला सोसायटीमध्ये फोनवर बोलत असतात गुरुवारी सकाळी ही घटना घडली. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सोसायटीने पालिकेचे ऐकले नाही
अंधेरीच्या ज्या तक्षशिला सोसायटीमध्ये झाड पडून अनिल घोसाळकर यांचा मृत्यू झाला त्या सोसायटीला पालिकेने 22 एप्रिल रोजी पत्र लिहून सोसायटीच्या आवारातील धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्याचे निर्देश दिले होते. पालिकेच्या पाहणीत या सोसायटीतील झाडांच्या फांद्या धोकादायक असल्याचे आढळले होते. त्यामुळे पालिकेची परवानगी घेऊन धोकादायक फांद्या तोडाव्यात अन्यथा होणाऱया दुर्घटनेला संबंधित सोसायटी जबाबदार राहील, असा इशाराही पालिकेने दिला होता, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच दुर्घटना
पी उत्तर विभागातील नारीयलवाला कॉलनीतील धोकादायक फांद्यांची छाटणी करावी यासाठी माजी नगरसेवक अशोक पटेल यांनी उद्यान खात्याच्या संबंधित अधिकारी मोरजकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी आधी एस. व्ही. रोडवरील झाडांची छाटणी आधी करू आणि त्यानंतर आतील रस्त्यावरील झाडांची छाटणी करणार असल्याचे सांगितले होते. या झाडांच्या फांद्या वेळीच छाटल्या असत्या तर ही दुर्घटना टळली असती असे ते म्हणाले.
गोवंडीत बीएआरसी कर्मचाऱयाचा मृत्यू
अंधेरी आणि मालाड पाठोपाठ गोवंडी येथे झाड पडून एकाचा मृत्यू झाला. अणुशक्ती नगर येथील बीएआरसी येथे झाडाची फांदी नितीन विष्णू शिवलकर (43) यांच्या अंगावर पडली. त्यात गंभीर जखमी झालेल्या शिवलकर यांना तातडीने बीएआरसी रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे डॉक्टरांनी शिवलकर यांना मृत घोषित केले.
दादरमध्ये विद्यार्थी थोडक्यात बचावले
दादरमध्ये साने गुरुजी विद्यालयासमोर शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली. साडेअकरा वाजता शाळा सुटल्यानंतर मुले बाहेर आली. या झाडाच्या खालीच विद्यार्थ्यांची बस उभी केलेली असते. ही बस 12 वाजता सुटली आणि पाचच मिनिटांनी शाळेसमोरचे भलेमोठे झाड कोसळले. दैव बलवत्तर म्हणून विद्यार्थी थोडक्यात बचावले.
8 वर्षांत 28 बळी
वर्ष मृत्यू
2012 1
2013 0
2014 0
2015 9
2016 3
2017 4
2018 7
2019 4
एकूण 28
































































