
>> डॉ. विशाखा गारखेडकर
बेरकी नजर व संवादफेकीची स्वतःची शैली आणि जबरदस्त देहबोली या भांडवलावर 60 वर्षे हिंदी चित्रपटात खलनायक ते चरित्र अभिनेता असा प्रवास केलेल्या प्राण यांचे हे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. एकटय़ाच्या बळावर चित्रपट खेचून नेणारा खलनायक हिंदी चित्रपटसृष्टीत झाला नव्हता, ना पुढे होईल. प्राण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केलेले हे स्मरण…
तो पडद्यावर आला की छातीतील धडधड काढायची, हाताच्या मुठी आवळायच्या, पायातील चपला वळवळ करायच्या. हो… इतका तो दुष्ट, निष्ठूर, पातकी, विश्वासघातकी आणि बेरकी होता. त्याचे नाव होते प्राण. पूर्ण नाव सांगायचे तर प्राण कृष्ण सिकंदर जो प्रत्येक चित्रपटात रसिकांना हवाहवासा वाटायचा.
1950 च्या पुढील दोन-चार दशकांत त्याच्या शिवाय चित्रपटांचा विचार केला जात नव्हता. इतका तो लोकप्रिय खलनायक होता. त्याने हिंदी चित्रपटातील खलनायकाची परिभाषाच मोडीत काढली. देहबोलीचा उत्तम वापर आणि संवादाची अनोखी अदा या जोरावर पन्नास वर्षे तो इंडस्ट्रीत टिकला, ‘बरखुरदार’ हा एकच शब्द, पण प्राणच्या तोंडून ऐकण्यात जी मजा आहे ती अन्य कोणाच्याच नाही. जंजीरमध्ये अमिताभच्या डोळय़ाला डोळा भिडवत ‘इस इलाके में नये आये हो साहब (इथे साहब या शब्दावर जोर) वरना शेरखानको कौन नही जनता’ असे म्हणणारा शेरखान अजूनही डोळय़ासमोरून जाणे शक्य नाही. ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटात फाशीसाठी गळय़ाकरून बोट फिरवायची अदा आणि त्यावेळी डोळय़ातील भेदकपणा प्रक्षकांना जागेवरच थंड करून जायचा. खलनायक असो की चरित्र अभिनेता, पण वाटय़ाला आलेल्या भूमिकांशी अत्यंत प्रामाणिक राहून त्यांनी चारशेपेक्षा अधिक चित्रपटात काम केले.
प्राण यांच्या खलनायकीचे यश कशात आहे हे शोधायचा प्रयत्न केला तर ते हिंदुस्थान-पाक फाळणीतील त्यांना झालेल्या तीव्र दुःखात असल्याचे दिसून येते. दिल्लीत सधन कुटुंबात जन्म घेतलेल्या प्राण यांना फोटोग्राफीचा छंद जडला. लाहोरमध्ये ते फोटोग्राफीचा व्यवसाय करण्यासाठी गेले. त्यावेळी मित्रांसोबत अनेकदा ते पानटपरीवर पान खाण्यासाठी जायचे. प्राण यांची पान लावण्याची अदा बघून त्यांना वली मोहंमद यांनी चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. मुळातच बेफिकीरपणा अंगी असलेल्या प्राण यांनी त्याकडे गांभीर्याने बघितले नाही. वली मोहंमद त्यांना पुन्हा भेटले आणि पुन्हा विनंती केली. 1940 मध्ये ‘यमला जट’ या पहिल्या पंजाबी चित्रपटात त्यांना भूमिका दिली. हा चित्रपट लोकप्रिय झाला. फाळणीपूर्वी जवळपास 17 चित्रपटांमध्ये काम केले. अचानक हिंदुस्थान-पाक फाळणी झाली. प्राण लाहोरहून हिंदुस्थानात स्थलांतरित झाले.
नायक म्हणूनही प्राण यांनी प्रारंभीच्या काळात काम केले. फाळणीनंतर मुंबईत आल्यावर काही काळ त्यांना संघर्ष करावा लागला. देव आनंद यांच्या ‘जिद्दी’ या चित्रपटात त्यांना संधी मिळाली आणि मग मात्र त्यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही. मधुमती, जॉनी मेरा नाम, काश्मिर की कली, पूरब और पश्चिम, बडी बहन, हाफ टिकट, जिस देश मे गंगा बहती है, शहीद, राम और शाम, उपकार, डॉन, जंजीर अशा प्राण यांच्या कितीतरी चित्रपटांची नावे सांगता येतील. दिलीप कुमार, राजकुमार, अमिताभ या दिग्गज नायकांसमोरही प्राण ताकदीने उभे राहिले. राजेश खन्नामध्ये शिस्तीचा अभाव असल्याने त्यांनी अखेरपर्यंत राजेश खन्नासोबत चित्रपटात काम केले नाही. आपल्या अटी आणि शर्ती निर्माता आणि दिग्दर्शकाला टाकणारा प्राणसारखा खलनायक झाला नाही आणि होणारही नाही.
हिंदी चित्रपटात बरेच खलनायक होऊन गेले, पण प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे फार मोजकेच झाले. ‘राम और शाम’ पाहिल्यानंतर तर लोक शिव्या देत थिएटरमधून बाहेर पडायचे इतकी घृणा आपल्या अभिनय सामर्थ्यावर त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर आयोजित केलेल्या पार्टीत प्राण यांना काही जणांनी दगड मारले, पण त्यांनी प्रेक्षकांकर राग न धरता माझ्या अभिनयाची ही दाद आहे त्यामुळे हे दगड नसून फुले आहेत असे म्हणत प्रेक्षकांच्या भावनांचा आदरच केला. आवाजातील भेदकपणा, बेरकी नजर, तिरपे ओठ करून सिगरेटचा धूर उडवणे, पान खाण्याची विशेष अदा यासोबत संवादात एखाद्या शब्दावर ते असा काही जोर द्यायचे की तोच शब्द हा प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहायचा.
‘अदालत’ चित्रपटातील त्यांचा अभिनय बघून प्रेक्षक गारठले होते. त्याचकेळी ‘उपकार’मधील कुबडय़ा घेऊन चालणारा मलंग चाचा लोकांना तितकाच भावला आणि आपल्यातील वाटला, तर दुसरीकडे ‘शराबी’मधील पैशाची मस्ती असणारा उद्योजक, परंतु मुलाच्या प्रेमाला आसूसलेला बाप अशा दोन परस्पर टोकाच्या त्यांच्या भूमिका पाहून आपल्याही डोळय़ात नकळत पाणी येऊन जातं. पडद्यावर दुष्ट वाटणारे प्राण राज कपूर यांच्या मैत्रीला जागले. कर्जबाजारी राज कपूर यांच्या ‘बॉबी’मध्ये एक रुपया घेऊन काम केले असा हा दिलदार माणूस.
‘शिश महल’मध्ये ‘मैं पुराना चिडीमार हू, पर कतराना अच्छी तरहसे जानता हू’ किंका ‘काश्मिर की कली’मध्ये ‘शराले, शराले मेरा भी समय आयेगा’ असे जेव्हा बेरकी व छद्मीपणे प्राण म्हणायचे तेव्हा त्यांच्या अभिनयाचा आवाका किती जबर आहे हे समजून यायचे. खूप सहज संवादफेक त्यांच्या अभिनयाची टॅग लाइन होऊन जायची. पूर्वी बटबटीत वेशभूषा किंवा रंगभूषा दाखवून खलनायक दाखवायचा प्रघात होता. तो लफंगा, ठग, कंजूष दाखवला म्हणजे पुरे अशी खलनायकाची मर्यादित कल्पना होती. परंतु प्राण यांनी बेरकी, छद्मी, खूंखार नजरेने भुवई उडवत जरब बसवणारा आणि तितकाच थंड डोक्याचा खलनायक साकारत पारंपरिक समजाला छेद दिला.
खलनायक म्हणजे जाड गलेलठ्ठ, एकाच जागी बसून आदेश देणारा कगैरे असे काही दाखवले जात असताना प्राण मात्र त्यामध्ये कुठेही बसणारे नक्हते. त्यांच्या हालचाली फार चपळ आणि लवचिक होत्या. केकळ आपल्या देहबोलीवर खलनायक साकारला आणि प्रेक्षकांमध्ये रुजवला. खूप गँग सोबत ठेवून रुबाब झाडणारा, बॉडीगार्डच्या छायेत वावरणारा, मारझोड करणारा खलनायक प्राण यांनी कधी रंगवला नाही. एकटय़ाच्या बळाकर सगळी कट कारस्थाने करून एक हाती किल्ला ते प्रत्येक चित्रपटात लढवत गेले. त्यामुळे खूपशा चित्रपटांमध्ये प्राण हेच केंद्रस्थानी ठरले. त्यांनी प्रत्येक भूमिकेत ‘प्राण’ ओतून काम केले आणि ते पडद्यावर आले की, प्रेक्षकही डोळय़ात प्राण ओतून त्यांची कारस्थाने बघत असे. त्यांच्या भूमिकांचा धसका इतका घेतला गेला की, त्या काळात घरात कोणाचेही नाव ‘प्राण’ हे ठेवले जात नसे. प्राण यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले. तथापि दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना खूप उशिरा प्राप्त झाला. आपल्याकडे खऱ्या कलावंताची कदर खूप उशिरा केली जाते. प्राण यांच्याबाबतीत तसेच काहीसे झाले. फाळके पुरस्काराने ते गहिवरले होते. खलनायकाच्या भूमिकेला नवे आयाम देणारा हा कलावंत 12 जुलै 2013 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी आपल्यातून गेला. त्याच्या निधनाने खलनायकाच्या एका अभ्यासू संस्थेचा अंत झाला.
[email protected]


























































