
>> डॉ. विजय ढवळे
सप्टेंबर 11, 2001. न्यूयॉर्कमधील 2 व्यापारी मनोरे ओसामा बिन लादेन या आतंकवाद्याने त्या इमारतीत विमाने घुसवून पाडले. या खुनी हल्ल्यात 3,000 निरपराधी लोक मरण पावले. त्या दिवसापासून अमेरिका ओसामाचा कसून शोध घेत होती. अफगाणिस्तानच्या गुहांमध्ये राहणाऱया त्या क्रूरकर्म्याला पळताभुई थोडी झाली होती. हा 6 फूट 4 इंची माणूस स्वतःला ट्रकच्या खाली स्वतःला बांधून पाकिस्तानात सटकला व तेथे त्याला राजाश्रयच मिळाला. पाच वर्षे तो बिनधास्तपणे राहात होता. शेवटी त्याचा छडा लावण्यामध्ये ड्रोन विमानांचा महत्त्वाचा हिस्सा होता. ही विमाने अगदी चिमणीच्याही आकाराहून लहान असू शकतात. त्यांना पायलट लागत नाही. ती संगणक व रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने उडवली जातात. अगदी खिडकीवरही ती उतरू शकतात. एकविसाव्या शतकात हवाई दलाच्या सामर्थ्यामध्ये ही अतिशय मोलाची भर पडली आहे. ड्रोन विमाने देशाच्या सुरक्षिततेकरिता प्रचंड वरदान ठरू शकतात हे प्रथम अमेरिकेने ओळखले आणि तंत्रज्ञानात नेत्रदीपक प्रगती केली. सध्या 10 लाख लोकांकडे ड्रोन विमान उडवण्याचे परवाने आहेत. पैकी 20% हे कमर्शिअल पायलटस् आहेत. त्यांचा विविध प्रकारे, कल्पनातीत उपयोग होऊ शकतो. त्याचे प्रत्यंतर आले ते सप्टेंबर 2017 मध्ये. अमेरिकेचाच एक भाग पोर्ट रिको आहे. त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला नाही तरी तेथे 50 लाख लोकवस्ती आहे. सप्टेंबर 2017 मध्ये चक्रीवादळांचा जबरदस्त दणका बसला आणि पोर्टरिकोतली वीज गूल झाली! मोबाईल फोन्स, संगणक नेटवर्क सर्व ठप्प झाले.
अमेरिकन टेलिफोन्स व टेलिकम्युनिकेशन्स (AT & T) ही जगातली अग्रगण्य कंपनी. तिने आगळाच प्रयोग केला. एक ड्रोन विमान सोडले ज्याला नाव दिले ‘‘फ्लाईंग काऊ.’’ कमाल म्हणजे हे ड्रोन विमान त्याच्या परिसरातल्या 40 किलोमीटर्स भागात मोबाईलचे सिग्नल्स पुन्हा प्रस्थापित करू शकले होते. हे विमान वॉलमार्ट या कंपनीच्या पार्किंग लॉटमधून पोर्ट रिकोच्या दिशेने उडवण्यात आले. पायलटरहित. जग आश्चर्यचकित झाले. ड्रोन्सचा उदो उदो झाला. 2001 पासूनच अल कायदा या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे उखडून काढण्याकरिता अमेरिका ड्रोनचे सामर्थ्य वाढवत होतीच. तेव्हापासून ही विमाने लष्करी कारवाईचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. ओबामाच्या कारकीर्दीत हे तंत्रज्ञान बहरले. ट्रंपने तर ड्रोन्सना अगदी खांद्यावरच उचलून धरले आहे. त्यांची उपयुक्तता लक्षात आल्यामुळे त्यांना जगभर प्रचंड मागणी आहे. 2017 मध्ये जगात एकूण 30 लाख ड्रोन विमानांची तडाखेबंद विक्री झाली. जेव्हा ही विमाने सामान्य नागरिक वापरतात तेव्हा त्यांचे उद्दिष्ट मर्यादित असते. ती हेलिकॉप्टरसारखी सरळ रेषेतच वर उडतात. ही अमेरिकन शेतकरी पिके व त्यांची बडदास्त ठेवण्याकरिता वापरतात. त्याचप्रमाणे चित्तथरारक घटनांचे शूटिंग करण्याकरिता हॉलीवूड सिनेनिर्माते त्यांचा उपयोग करतात.
कॅलिफोर्नियातल्या जंगलात माणसे हरवण्याच्या घटना नित्य नियमाने घडत असतात. त्यावर फार प्रभावी उपाययोजना नव्हती. ती कसर ड्रोन्सनी भरून काढली. 2017 साली 60 जणांना ड्रोन्समुळे शोधून काढता आले! ही विमाने काही कल्पक उद्योजक आडवाटेवर राहणाऱया त्यांच्या ग्राहकांच्या घरी गरम पिझ्झा पोहोचवण्याकरिताही वापरतात. ऍमेझॉनचे आता त्याच्याकडे लक्ष वेधले गेले आहे व आपली उत्पादने कमी खर्चात ग्राहकांकडे विनासायास पोहोचवण्याचे साधन म्हणून पाहत आहे. आरोग्य खात्याकडूनही हृदय, यकृत, मूत्राशय असे अवयव रोपणासाठी या ड्रोन्समधून पाठवले जाऊ लागले आहेत. फेसबुकचे अत्यंत दुर्गम भागांतही ड्रोन्सच्या सहाय्याने आपले तंत्रज्ञान कसे पोहोचवता येईल यावर प्रयोग चालू झाले आहेत. स्कायकॅच नावाची कंपनी या विमानांच्या उत्पादनात आघाडीवर आहे.
जिथे अमृत असते तिथे विषही सापडतेच. अमली पदार्थ तुरुंगात विनासायास पाठवण्याकरिता ड्रोन्सचा वापर ही अमेरिकेची मोठे डोकेदुखी बनली आहे. त्याचप्रमाणे ज्या ख्यातनाम व्यक्ती नटनटय़ा, राजकारणी त्यांच्या प्रायव्हसीला जपतात, त्यांच्या घरांवरून ही छोटेखानी विमाने घिरटय़ा घालतात व ती मंडळी पोहण्याच्या तलावांत डुंबत असतात, त्यांची हजारो छायाचित्रे काही मिनिटांतच घेतात. ही ड्रोन विमाने कोकाकोलाच्या कॅनच्या आकाराची असू शकतात. मग आकार वाढत जाऊन छोटय़ाशा फ्रीजच्या आकारांचीही उपलब्ध आहेत. पायलटच्या दृष्टिक्षेपात जेवढा भाग येतो तितक्याच भागात ड्रोन विमानाचा वावर झाला पाहिजे असा कायदा पास होऊ शकला नाही. कारण त्यावर सडकून टीका झाली. अगदी व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होते असाही दावा करण्यात आला. अमेरिकेत तर विमानांचा सुळसुळाट आहेच. त्यात अवकाशात या नव्या पाहुण्यांची भर पडत आहे. त्यामुळे ‘नॅसा’ संस्थेपुढे त्यांचे प्रश्नचिन्ह उभे आहे. जुलै 2017. साऊथ कॅरोलिना राज्यामध्ये अतिसुरक्षा व्यवस्था असलेल्या तुरुंगामधून जिमी कॉसी हा खतरनाक कैदी पळाला. त्याने आपल्या जागी एक डमी बाहुली स्थानापन्न केलेली होती. चार सुरक्षा भिंती, त्याच्या तुरुंगाच्या खोलीचे भरभक्कम गज हे काप्ण्याकरिता आवश्यक असणाऱया करवती त्याने ड्रोन्सच्या माध्यमातून मिळवल्या होत्या!
एम क्यू प्रिडेटर आणि रिपर नावाची ड्रोन्स अमेरिकेने मुक्तहस्ते वापरली. त्यामधून 500 पौंड बॉम्ब आतंकवाद्यांच्या अड्डय़ांवर टाकले व ते तळ उद्ध्वस्त केले. ही ड्रोन्स नवाडा राज्यात असलेल्या वाळवंटांमधून उडवली होती. पायलट लागत नसल्याने मनुष्यहानी नाही. पण टार्गेट असेल तेथे जीवितहानी हमखास होते! त्याबरोबर मानवतेच्या नावाने गळा काढणाऱया संघटना हा अन्याय आहे अशी हाकाटी करू लागल्या. मग त्या जिहादी खुन्यांनी निरपराध्यांचे मनमानी बळी घ्यावेत त्यात कशी होत नाही मानवी मूल्यांची चिरफाड? जा ना त्यांच्या तळांवर, त्यांचे मतपरिवर्तन करायला. सध्या हौशीखातर ड्रोन्स उडवणारे 400 फुटांवर जाऊ शकत नाहीत व विमानतळाच्या 5 मैलांच्या कक्षेत येऊ शकत नाहीत असा कडक कायदा आहे. पण हा धाब्यावर बसवण्यात थ्रिल मानणाऱयांची संख्या वाढतेच आहे. 2014 साली अशा फक्त 238 घटना घडल्या होत्या,
सगळय़ात कहर म्हणजे 2015 साली एका हौशी ड्रोन वैमानिकाचा ताबा सुटला व ते विमान चक्क व्हाईट हाऊसच्या हिरवळीवरच आदळले. या 18 एकर प्रॉपर्टीच्या भोवतीच्या सुरक्षा यंत्रणांना त्याने कसे चकवले हे शोधण्यात भल्याभल्यांची मती गुंग झाली होती. आयसिसने अमेरिकन चढायांना तोंड देण्याकरिता लहान लहान ड्रोन्सचा सर्रास वापर केला होता तरी मोसूल शहरातून दहशतवाद्यांचा खातमा झालाच. पण अमेरिकेचेही बरेच नुकसान झाले. त्यावर उपाय म्हणून अमेरिकेने लहान ड्रोन्स शोधून काढले की जे खतरनाक ड्रोन्सचा छडा लावतील व त्यांचा नायनाट करतील.
हॉलंड, इंग्लंड येथील शास्त्रज्ञसुद्धा ड्रोन्सपासून होणारे अपाय नष्ट करण्याच्या दृष्टीने खूप संशोधन करीत आहेत. त्यात थर्मल आणि एकॉस्टिक सेन्सॉर्सचा उपयोग केलेला असतो. इतरही प्रगत राष्ट्रे या प्रकारच्या उत्पादनात आघाडी घेऊ पाहत आहेत. एकूण 33 देशांत 230 उत्पादने तयार होत आहेत. जिमी कॉसी या महाघातकी कैद्याला ड्रोनमुळे पळून जाता आले, त्याच ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुन्हा कैदेतही डांबले गेले! आता अतिसुरक्षा तुरुंगापासून 210 फुटांवर ड्रोन्स थांबवली जातील अशी यंत्रणा बसवली गेली. कोणतीही समस्या उद्भवली की, त्याचा निचरा करण्यात अमेरिका नेहमी आघाडीवर असते. अशीच ड्रोन विमाने हिंदुस्थानी लष्कराने हस्तगत करून कश्मीरच्या सरहद्दीवरून बेछूट गोळीबार करणाऱया पाकडय़ांना नष्ट करावे, अशीच तळमळ प्रत्येक देशप्रेमी हिंदुस्थानी नागरिकाच्या मनात असणे स्वाभाविकच म्हणायला हवे.
(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहे.)



























































