फेडररचा दस का दम, डेव्हिड गॉफिनला हरवत दहाव्यांदा जिंकली एटीपी स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हॉल

सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जिंकणार्‍या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने रविवारी बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनला पराभूत करीत हॉल एटीपी स्पर्धा जेतेपदावर नाव कोरले. रॉजर फेडररचे हे या स्पर्धेतील दहावे अजिंक्यपद ठरले हे विशेष. तसेच एकेरीतील 102 वी स्पर्धा जिंकण्याची करामतही त्याने यावेळी करून दाखवली. यंदाच्या मोसमात ग्रासकोर्टवर अपराजित राहणार्‍या रॉजर फेडररने विम्बल्डन स्पर्धेआधी आत्मविश्वास कमवला.

रॉजर फेडररने डेव्हिड गॉफिनचे आव्हान 7-6, 6-1 अशा फरकाने परतवून लावत झळाळता करंडक पटकावला. ही स्पर्धा जिंकल्यानंतर दिग्गज टेनिसपटू म्हणाला, या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालो तेव्हा दहा वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावीन हे वाटले नव्हते. त्यामुळे हे जेतेपद ‘खास’ व ‘संस्मरणीय’ ठरलेय.

पहिल्यांदाच घडले

रॉजर फेडररने हॉल टेनिस स्पर्धा दहाव्यांदा जिंकली. कोणत्याही स्पर्धा जेतेपदाची दुहेरी संख्या रॉजर फेडररला पहिल्यांदाच गाठता आलीय. याआधी त्याने विम्बल्डन व दुबई ओपन या स्पर्धा आठ वेळा जिंकल्या होत्या. तसेच रॉजर फेडरर याने बॅसेल या त्याच्या मायदेशातील स्पर्धेचे नऊ वेळा जेतेपद पटकावले आहे.