‘चॅनेल क्षेत्रात’ धो-धो पाऊस! महाराष्ट्र मान्सूनच्या प्रतीक्षेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे/मुंबई

जून महिना संपत आला तरी मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला जोरदार मान्सूनची प्रतीक्षा आहे. ज्या ठिकाणी पाऊस झाला तिथे फार जोर नाही. केवळ जमिनीची काहिली शांत केली आहे. पेरणीच्या चिंतेत बळीराजा आहे. शहरांत ढगांची गर्दी आणि गावांत शिवार कोरडे अशी विचित्र परिस्थिती असताना वृत्तवाहिन्यांवर ‘चॅनल क्षेत्रात’ मात्र धो-धो पाऊस आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या 93 टक्के भागात मान्सूनने हजेरी लावल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.

दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवडय़ात कोकण, मुंबई, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या पावसाने चिंब होतो. दुष्काळ, पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला या वर्षी मान्सूनची जोरदार सुरुवात होईल, अशी आशा होती. मात्र यंदा मान्सून उशिरा आला; पण तोही अडखळतच. तळकोकणात ठराविक भागात मालवण, कणकवली, वैभववाडीत पाऊस आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्हय़ात सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, डोडामार्ग येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रात नगर जिल्हय़ाच्या उत्तर भागात तसेच मराठवाडय़ात भोकरदनसह काही क्षेत्र वगळता सर्वत्र पावसाचा जोर नाही.

मुंबईला हुलकावणी

मुंबईत 10 जूनला मान्सूनचे आगमन होते. पण या वर्षी जादा 15 दिवस झाले तरी पाऊस नाही. गेल्या दहा वर्षांतील सर्वात जास्त लांबलेला मान्सून आहे. 2009मध्ये 27 जूनला मुंबईत मान्सून कोसळला होता.

पश्चिम महाराष्ट्राला प्रतीक्षा

पश्चिम महाराष्ट्राला मान्सूनची प्रतीक्षा आहे. कोल्हापूर जिल्हय़ात आजरा, चंदगड, करवीर तालुक्यात सोमवारी हलक्या सरी बरसल्या. मात्र मंगळवारी केवळ ढगांची गर्दी पाहायला मिळाली. गगनबावडा येथे दरवर्षी विक्रमी पाऊस होतो. महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हटले जाते. मात्र येथे या वर्षी किरकोळ पाऊस झाला आहे. जूनच्या शेवटचा आठवडा उलटला तरी पेरण्या नाहीत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

  • सातारा जिल्हय़ातही पाऊस नाही. दुष्काळी भाग असलेल्या माण, खटाव तालुका कोरडाच आहे.
  • सांगली जिल्हय़ात दोन दिवसांत केवळ 16.20 मि.मी. पाऊस झाला. जिल्हय़ाचा पूर्व भाग कोरडाच असून पेरण्या खोळंबल्या आहेत. कडेगाव तालुक्यात सर्वाधिक 32.4 मि.मी. पावसाची नोंद झाली.
  • नगर जिल्हय़ात सर्वाधिक कोपरगाव तालुक्यात 169 मि.मी. पाऊस झाला. अकोले 133, पाथर्डी 107 मि.मी, मात्र संगमनेर 12, श्रीरामपूर 19, पारनेर तालुक्यात 18 मि.मी. पाऊस झाला आहे.